१.
आलो तुझ्याच दारी उमगून घ्यावयाला
संदर्भ जीवनाचा समजून घ्यावयाला
कुरवाळुनी मलाही सांगा जरा कधीतर
आहे तयार मीही ऐकून घ्यावयाला
कोठे नशीब फसले कळले कधीच नाही
मी हिंडतो कधीचा जाणून घ्यावयाला
तुटले जरी जगाशी नाते जुनाट अपुले
येणार ना कधीही जमवून घ्यावयाला
शेती करूनिया मी पिकवीन धान्य आता
मी बावळा नसे रे टांगून घ्यावयाला
२.
प्रेम नात्यातले वाढले पाहिजे
वैर दोघांतले संपले पाहिजे
गैर समजास का पाळतो आजही
गैरसमजास या छाटले पाहिजे
फार मिळते सजा प्रेम केल्यावरी
जीव मी लावणे रोखले पाहिजे
घात झाला तरी थांबतो मी कुठे
काय साधायचे समजले पाहिजे
रोज छळतो म्हणे माय-बापासही
नांगराला तुला जुंपले पाहिजे
एवढे चांगले काम करुया अता
नाव ओठांवरी राहिले पाहिजे
३.
काहूर माजले तर समजून घ्या जरासे
भेटून एकदाचे बोलून घ्या जरासे
होतील वाद जेव्हा मध्यात जीवनाच्या
दोघे मिळून तेव्हा जमवून घ्या जरासे
चुकले जरी कुणाचे वा ठेच लागली तर
घेऊन हात हाती समजून घ्या जरासे
नजरानजर इथे तर दररोज होत असते,
नजरेतल्या दरीला मिटवून घ्या जरासे!
जर बंद ओठ खुलले तर फक्त हेच करणे
ओठांतले खुलासे ऐकून घ्या जरासे
....................................................
