Showing posts with label शंकर विटणकर. Show all posts
Showing posts with label शंकर विटणकर. Show all posts

तीन गझला : शंकर विटणकर

 



१.

मी जगाचा प्यार झालो यार हो
प्रीतिचा उपहार झालो यार हो

या श्रमीकांनो जरा विश्राम घ्या
पिंपळाचा पार झालो यार हो

आग वैराची भडकता चहुकडे
प्रीतिचा मल्हार झालो यार हो

सत्य हारू लागता कपटांपुढे
क्रांतिचा एल्गार झालो यार हो

टाळले अपुल्यांनिही बघ संकटी
दुःखि तेव्हा फार झालो यार हो

दुःख आहे बांधलेले गाठिशी
मी नव्हे नादार झालो यार हो !

जाहलो मजनू तिच्या प्रेमामधे
मी कुठे बेकार झालो यार हो

आठवीता झळक ती पुनवेपरी
आसवांचा हार झालो यार हो

२.

बदलल्यात राती हवा तीच आहे
नव्या पौर्णिमेची नशा तीच आहे

कधीचा निघालो तुझा शोध घ्याया
बदलल्यात वाटा दिशा तीच आहे

हजारोत पंडित - कथाकार झाले
तुझी जीवना पण कथा तीच आहे

पुन्हा बुद्ध आला बघा भीम होउन
नव्या चेहऱ्याची छटा तीच आहे

निराळ्या प्रदेशी निराळ्याच बोली
परी बोलण्यातिल व्यथा तीच आहे

बदलत्या ऋतूंनी बदलली फुलेही
परी अंतरातिल उषा तीच आहे

किती चेहरे या युगांनी बदलले
कसे कृष्ण-राधा सदा तीच आहे

बघा दूरचे लोक झाले जवळचे
असो देश परके धरा तीच आहे

कसे आज हिणवू गरीबीस अपुल्या
तमाच्या कुशीतिल उद्या तीच आहे

कसे रंग विसरू तुझ्या संगतीचे
पिता आसवांना मजा तीच आहे

बदलण्यास बदलो इतीहास देखिल
घडायास माणुस विधा तीच आहे

३.

फिरुन चंद्र-ताऱ्यात आली हवा
फुलांच्या मधे फूल झाली हवा

कळे ना कुणाशी कसे मन जुळे
फिरे मग तया भोवताली हवा

वसंती असो वा शिशिर तो सखा
करी जीव त्याच्या हवाली हवा

दिसेना जिच्या फूल फांदीवरी
तिला फूल द्याया निघाली हवा

कुणीही दिवा अंतरी चेतवा
तया ज्योत देइन म्हणाली हवा

भटकते कलंदर वनी-डोंगरी
जशी पोर कोणी मवाली हवा

बघा पेलते नभहि खांद्यावरी
जगाचीच या माय झाली हवा

हसू दे तुझ्या आज ओठांवरी
सदा आसवांनाच प्याली हवा
.................................
शंकर विटणकर
९८६००२४६२९