१.
मनाच्या कोंडमाऱ्याला कुणी का भाळते सांगा?
सुखाच्या गोड वाऱ्याला कुणी का टाळते सांगा ?
भरारी मारतो जेव्हा मनाचा मोकळा रावा
रिकामा पिंजरा तो का कुणी सांभाळते सांगा?
जरी व्यापार राखेचा असे तेजित आलेला
तरी तो राहता वाडा कुणी का जाळते सांगा?
पडावे थेंब पाण्याचे जळाने खेळ खेळावा
अशा या मोसमावेळी कुणी का वाळते सांगा?
दयेची दाटते दाटी चहू बाजूस देणारे
अशा काळात डोळ्यांना कुणी का गाळते सांगा?
कितीही गांजला कोणी निराशा वाढवी चिंता
मढ्याची राख देहाला कुणी का माळते सांगा ?
कचेरीतून देखावा जणू माणूस कामाचा
दिलेली वेळ कामाची कुणी का पाळते सांगा ?
२.
धावत्याच्या पाठमोरे हातचे सोडून जावे
हेच ठावे वाचलेले त्या क्षणी खोडून जावे
मांडलेला डाव साथी रंगलेले दंगलेले
ना कुणा वाटे कधीही डाव तो मोडून जावे
हात हाती गुंफलेले चालताना छान वाटे
एकमेका भावणारे ते दुवे जोडून जावे
बांधल्या भिंती कुणी ज्या भेदभावाच्या इथेही
थांबली ज्याने गती ती बंधने तोडून जावे
गुंतलेला प्राण जेथे भावनांचे बांध मोठे
सोडताना या जगाला त्यांसही फोडून जावे
.................................
श्री. एकनाथ गायकवाड
जनता विद्यामंदिर, ता.मालवण जि. सिंधुदुर्ग
पिन.416 614
मो.नं.9421182337