१.
कुरघोडी केल्याने हाती काही लागत नाही
थोडे नमते घेउन टाका काही बिघडत नाही
मीच खरा माझेच खरे हा अहंकार का धरता?
विनाशास आमंत्रण आपण देतो उमजत नाही
दुखावतो का मनास आपण उगाच कोणाच्याही
जखम मनाची काही केल्या नंतर वाळत नाही
मनी आपल्या जे असते ते समोरच्याही असते
अहंभाव पण काही केल्या सत्य स्विकारत नाही!
प्रेम जिवाला ध्येय गाठण्यासाठी मदतच करते
प्रेमावाचुन जगण्याचा या अर्थ सापडत नाही!
मिथ्या आहे हे जग सारे जाण एवढे मित्रा
गोष्ट खरी ही विसरलास तर मुळीच धडगत नाही
नाद घुमावा साऱ्या जगती असा बोल तू नाऱ्या
कर मन मोठे नसेल पैसा हाती हरकत नाही
ध्येयाविन जगणे इथले हे असले कसले जगणे?
जगण्यासाठी ध्येयच ऊर्जा देते समजत नाही?
२.
असावे पाय जमिनीवर तुला समजायचे आहे!
जरी नभ लागले हाती धरेवर यायचे आहे!
कितीही जीव लावा पण कुठे ते आपले होते
वनीच्या पाखरालाही वनातच जायचे आहे!
जशा रुंदावल्या कक्षा अपेक्षांच्या तसे कळले
तुझ्या सौख्यात माझे सौख्यही मिसळायचे आहे!
किती शोधू? मनाचा थांग-पत्ता सापडत नाही
उभे आयुष्यभर त्याला मला शोधायचे आहे!
जगाच्याही पलीकडल्या जगाचे स्वप्न मी बघते
जिथे माझ्या मनाचे विश्व मज भेटायचे आहे!
तुझा सहवास लाभावा मला पूर्णत्व लाभावे
नवे आयुष्य दोघांनी असे फुलवायचे आहे!
सुखाची कल्पना सांगा नकोशी वाटते कोणा?
मला जर लाभले थोडे जगाला द्यायचे आहे!
३.
मला उद्याचे नकोच सांगू बोल आजचे
किती मारले तीर आजवर विसर कालचे!
जवळ जवळचे बघून कयास नकाच लावू
नजरेला द्या ताण जरासा बघा लांबचे!
तुम्हास नाही गरज आमची नसू देत ना
शिवाय तुमच्या अडले खेटर कुठे आमचे?
हसून बोला साऱ्यांशी मन मोकळे करा
काय काम उरते मग सांगा झंडु बामचे?
सर्व धर्म समभाव असे शिकवण धर्माची
नाव उगा बदनाम कशाला रहिम रामचे!
जिवंत असता करून सेवा माय-पित्याची
घरीच कमवा पुण्य आपल्या चार धामचे!
एक दोनदा सहानुभूती मिळेलही पण
गाउ नका रडगाणे अपुले रोज रोजचे!
ताट दिले जेवाया इथवर ठीकच आहे
बसावयाचे पाट आपले कसे द्यायचे?
जो तो अपुला स्वार्थ साधतो इथे कल्पना!
हे जर कळले नाही तर मग कसे व्हायचे?
...................................................
सौ.कल्पना गवरे
'शब्दांजनी '
UK