१.
काय माझे हरवले गावात आता
माणसे का वेगळ्या तावात आता
कर्म थोडे ठेव पाठीशी जरा तू
काय असते नेमके नावात आता
जिंकताना हारलो एका क्षणी मग
सर्व फासे टाकले डावात आता
जर मनाच्या पिंजऱ्यातुन मुक्त झालो
तर स्वतःला का विकू पावात आता
गादमाशी, तुडतुड्याने धान गेले
मग विकावे काय मी भावात आता
२.
सांज कोवळी क्षितिजावरती पसरत पसरत आली
मंतरलेल्या दुःखालाही भिजवत भिजवत आली
जुनाट झाल्या वाटा साऱ्या सोबत चालत असता
त्या वाटेवर तुझी सावली थबकत थबकत आली
आयुष्याच्या संध्याकाळी जरा पापणी ढळली
आठवणींचे पान गोजिरे दुमडत दुमडत आली
सूर्यालाही जाणवले ना पृथ्वीचे हे अंतर
ग्रहणाला का सावली तिची सरकत सरकत आली
सुखे वाटली अगोदर तिने रस्त्यारस्त्यांवरती
जगण्याविषयी नंतर 'ती 'ची हरकत हरकत आली
गरम तव्यावर राजकारणी पोळी भाजत असता
जनतेची का शिळी भाकरी करपत करपत आली
तू जगण्याला समृद्धीचे कारण म्हटल्यावरती
विदूषकाची खोटी भुमिका वठवत वठवत आली
आयुष्याच्या वळणावरती गझल भेटली जेव्हा
तेव्हा माझ्या जीवनात मग बरकत बरकत आली
३.
पापण्यांवर आसवांचे भार झाले
दुःख माझे आपसूकच ठार झाले
शेवटी मज थांबणे जमलेच नाही
सज्जनांचे रक्त जेथे गार झाले
माळले केसांत तू जे फूल साधे
त्या फुलांचे बघ सुगंधी हार झाले
राहण्या गावात आली काल दंगल
शांततेवर लाखदा मग वार झाले
भेटली जेव्हा नदी ही सागराला
सागराचे दुःख खारेशार झाले
..................................................