१.
मेघ सावळा निघून गेला
कोंब कोवळा जळून गेला
घाम गाळला, बळी तरीही
माल स्वस्त तो विकून गेला
रास्त भाव तो मिळेल केव्हा
वाट पाहुनी थकून गेला
ठेवली अता पडीक शेती
राब राबला, दमून गेला
संपली अता उमेद त्याची
कर्ज वाढता खचून गेला
२.
साथ घेत गझलेची वाट चालतो आहे
गोडवा मराठीचा त्यात पाहतो आहे
वाटते जरी सोपी पण गझल तशी नाही
अर्थपूर्ण शब्दांना रोज शोधतो आहे
मागते नव्याने ती चांगल्या विचारांना
द्यायचे कसे आता शब्द थांबतो आहे
बोलते जरी थोडे सत्य सांगते मोठे
स्पष्ट बोलणाराही मौन पाळतो आहे
काळजातुनी आली ती जरी गझल माझ्या
फक्त भाव शब्दांचे घट्ट बांधतो आहे
३.
केसानेही मान कापते कळले आता
विश्वासाची करवत बनते कळले आता
ज्याचा त्याचा स्वभाव असतो वेगवेगळा
चिखलामधले पंकज फुलते कळले आता
कुंपण काटे रक्षण करती फळबागांचे
काट्यालाही किंमत असते कळले आता
वाढत जाता व्याज पठाणी, कर्ज फिटेना
मनात त्याच्या काय चालले कळले आता
काठ नदीचा ठेवत जातो धाकात तिला
सागरास का तरी भेटते कळले आता
................................
हेमंत रत्नपारखी
मंगळवेढा
९८२२२३३३९५
