Showing posts with label गझलगंधर्व सुधाकर कदम. Show all posts
Showing posts with label गझलगंधर्व सुधाकर कदम. Show all posts

तीन गझला : गझलगंधर्व सुधाकर कदम

 


१.


हसून वा रडूनिया तुझे तुला जगायचे 

असेच दुःख झेलुनी सुखासवे हसायचे


कधी कुठे असायचे, कधी कुठे नसायचे

खुडून टाकले तरी नभात भिरभिरायचे


सुगंध घेउनी सवे दवात रोज न्हायचे

पुन्हा पुन्हा फुलूनिया खुशाल दर्वळायचे


मधाळ चांदरातही न राहिली मिठीत या

म्हणून का उगीच मी तुझ्याविना झुरायचे


हवे तसे जगावयास ना मिळे कुणासही

कठोर सत्य हेच मग उगीच का रडायचे


अस्वस्थ सप्तकातली श्रुतीमधूर स्पंदने

हळूच घेउनी सवे मजेत गुणगुणायचे


मुक्या-भुक्या जगात या जिवंत पोळला तरी

अखेरला पुन्हा 'तिथे' चितेवरी जळायचे


२.


सोसण्याचा सूर करणे ज्यास जमले

समजुनी घ्या,त्यास जगणेही उमगले


काय महिमा तुकोबाच्या अभंगांचा

बुडविली गाथा तरीही शब्द तरले


सैल करता गाठ जन्माची जराशी

वासनांचे बंध आपोआप गळले


चूक माझी की तुझी हे कळत नाही

पण मनाचे पेच मजला आज कळले


दुश्मनांशी लढत आलो जन्मभर...पण

त्यात अपुले पाहुनी अवसान गळले


गैरसमजातून घडते खूप काही

म्हणुन का दाखल करावे उगिच खटले


चाललो अंधारवाटेने जरी मी

पोचलो जेथे... तिथे मग नभ उजळले


३.


काय होते रोज मजला कळत नाही

दुःखही आता जिवाला छळत नाही


काळजाचे सर्व कप्पे रिक्त असता

बावरे मन अजुनही का चळत नाही


नाक घासुन, पाय धरिले, पण तरीही

कोणताही नवस अपुला फळत नाही


जिंकलेली तू ...तरी मी हारलो ना

कळुन सारे आपणा का वळत नाही


का?कशाला?पुजत जावे देव-देवी

माणसांचे मरण जर का टळत नाही


बालपण,तारुण्यही संपून गेले

दंभरूपी सुंभ पण हा जळत नाही 

....................................................