Showing posts with label डॉ.वैभव लोखंडे. Show all posts
Showing posts with label डॉ.वैभव लोखंडे. Show all posts

तीन गझला : डॉ. वैभव लोखंडे

 




१.

आक्रंद ऐकला मी चवदार त्या तळ्याचा
इतिहास रंगलेला पाण्यास मागण्याचा

संताप येत होता निष्ठूर वागण्याचा
पाण्यावरी स्वतःचा अधिकार सांगण्याचा

प्राण्यांस मुक्त होता, पक्ष्यांस मुक्त होता
शुद्रांस फक्त होता मज्जाव अमृताचा

रामास गोड वाटे ते रानबोर उष्टे
शबरीस नित्य होता का ध्यास राघवाचा

रामायणास रचले त्या थोर वाल्मिकीने
धर्मास गर्व आहे अस्पृश्य मानवाचा

दाम्यास रक्षणाला होई महार कान्हा
दरबार पाहतो रे जोहार विठ्ठलाचा

जागीर ना कुणाची अध्यात्म ज्ञान होते
दावे जगा जनाई तो ठाव माधवाचा

हे नाम गुंजले रे अस्थीत श्रीहरीचे
तो धन्य संत चोखा ताईत सावळ्याचा

हे थोर एकनाथा केलेस काय हे तू
घेऊन हीन हाती आस्वाद जेवणाचा

जन्मात जात नाही कर्मात जात आहे
हा मूलमंत्र आहे हिंदुत्व गौरवाचा

२.

विणावे मी पुन्हा शेले कबीराचे
चला होऊ पुन्हा चेले कबीराचे

पितो मी अमृताचे थेंब दोह्यांचे
असो ओठांवरी पेले कबीराचे

जपावे राम नामाला निराकारी
बनावे भक्त अलबेले कबीराचे

दरी मी दूर केली माणसांमधली
खरे सत्कार मी केले कबीराचे

अयोध्या नाहली रक्तात निष्पापी
विवेकी तत्व का मेले कबीराचे

प्रसादाने न केला भेद देताना
असे अदृश्य पातेले कबीराचे

उभ्या धर्मांध भिंती आजही येथे
निघूनी पर्व ते गेले कबीराचे

उपटली मी विषमतेची मुळे सारी
पुढे मी नाव हे नेले कबीराचे

३.

आम्हीच मूर्ख होतो ह्याच्यात वाद नाही
भांडून खून केले, फिटली मुराद नाही

का फाळणीत माझ्या शत्रूच मित्र होता
माणूस कापताना का आर्त साद नाही

एकाच काळजाचे छाटून भाग केले
गर्वात सांगतो की माझा प्रमाद नाही

आरोह सुन्न आहे अवरोह खिन्न आहे
मल्हार छेडताना रागी निषाद नाही .

वेशीवरी मनाच्या संचार खंजिरांचा
गावात गारद्यांची का मोजदाद नाही

मिरवून वारसा हा सिद्धार्थ नानकाचा
कोणीच वाटला का शांती प्रसाद नाही

गीतेस आळवाया कृष्णास वेळ नाही
अभिमन्यु मारताना का शंखनाद नाही
.
खोडून टाक सारे आदेश धर्मग्रंथी
धर्मांध वागण्याचा कलमा जिहाद नाही

चाचेच दंगली या झुंजार ना खलाशी
हारेल वादळाने तो सिंधबाद नाही

हा मेळ दानवांचा सत्तेत दाद नाही
हो खेळ मानवाचा सीमा विवाद नाही

.................................
डॉ.वैभव जगन्नाथ लोखंडे
ठाणे
९३२४१०३७०७