Showing posts with label योगिता पाटील. Show all posts
Showing posts with label योगिता पाटील. Show all posts

दोन गझला : योगिता पाटील

  




१.


उगा हसणे तुझे इतके बरे नाही

तसे तर दुःखही लपणे बरे नाही


तुझाही व्हायचा पाऊस फुलण्याने

सखे इतक्यात हे फुलणे बरे नाही


स्वतः जाऊन ये ना...भेट दुःखाला

तुला येतील हाका हे बरे नाही


अता रडलीच आहे तर नको लपवू

नको सांगू उगा खोटे बरे नाही


तुला वाटेल चुकल्यासारखे बहुधा

तुला वाटेल दरवळणे बरे नाही


किती घेशील आता जीव लोकांचा

असे गालातले हसणे बरे नाही


चुकीचे वाग अथवा वाग शिस्तीने

तरी म्हणतील ते की हे बरे नाही


किती चर्चा तुझ्या माझ्या ढगांचीही

तुझे माझे असे भिजणे बरे नाही


बरे नाही असे वेडावणे अपुले

पुन्हा प्रेमामधे पडणे बरे नाही 


२. 


कधी अवघड कधी सोप्या तुझ्या माझ्यातल्या गोष्टी

कधी रिमझिम कधी वारा तुझ्या माझ्यातल्या गोष्टी


कुणाला सांग समजावे तुझे माझे असे नाते

तुझ्या माझ्यात ठेवूया...तुझ्या माझ्यातल्या गोष्टी


जगाने कूस पालटली जराशी त्या दिशेला अन् 

तशा बहरात आलेल्या तुझ्या माझ्यातल्या गोष्टी


नकोसे वाटले तेंव्हा तुझे जगजीत सुद्धा बघ..

जणू गझलेतही होत्या तुझ्या माझ्यातल्या गोष्टी


अशा भलत्याच वेळेला उगा पाऊस आला हा

जगाला मग अशा कळल्या तुझ्या माझ्यातल्या गोष्टी


पुढे आलो किती चालत समजलेही कसे नाही

पुढे नाही कशा आल्या तुझ्या माझ्यातल्या गोष्टी?


कधी नुसत्याच ओठांवर कधी नुसत्याच श्वासांवर

कधी पुसल्या कधी लिहिल्या तुझ्या माझ्यातल्या गोष्टी 

...................................................