Showing posts with label संजय घाडगे. Show all posts
Showing posts with label संजय घाडगे. Show all posts

तीन गझला : संजय घाडगे

 





१.

काळीज चांदण्याचे माझे तुला दिले मी
प्रेमास जागताना सारे तुला दिले मी

जेव्हा जुळून आली नाती मनामनाची
आजन्म सोबतीचे वादे तुला दिले मी

शपथा उगा नको त्या आयुष्य जाळणाऱ्या
हातात हात दे तू गाणे तुला दिले मी.

पाऊस धुंद आहे रानात कोण गाते
पेरावयास शेती दाणे तुला दिले मी.

गेल्या उदास राती मोजून तारकांना
जागून रात सारी तारे तुला दिले मी.

२.

नाते मनामनाचे जोडू पुन्हा नव्याने
हे दंड साखळाचे तोडू पुन्हा नव्याने.

तो डाव मांडलेला सोडून कोण गेले
घोळात घोळ त्यांचा मोडू पुन्हा नव्याने.

मी राख लावलेली भाळी कधीच आहे
अन्याय रोज होतो गाडू पुन्हा नव्याने.

भांडून मायबापा गोठ्यात बांधले का
ऐशा नराधमांना झोडू पुन्हा नव्याने.

तू बांधलेस जेव्हा घरटे मनात माझ्या
तो राग-द्वेष आता सोडू पुन्हा नव्याने.

३.

उगा आठवांशी पुन्हा बोलतो मी
अशा धुंद वेळी किती भाळतो मी.

फुलावे कसे मी मलाही कळेना
नव्याने फुलाया पुन्हा टाळतो मी.

जरी वाटला गंध मी या जगाला
उरी दुःख दाटे मला जाळतो मी.

कुणाचे सरण हे जळू लागले रे
नको गर्व वेड्या तुला सांगतो मी.

इथे वादळाचे मनोरे झुलाया
भिडू दे मलाही आता डोलतो मी.

किती जाचला हा मला पावसाळा
मुक्या आसवांना उगा ढाळतो मी.

जगावे असे की जगी नाव व्हावे
उरावेस मागे असा वागतो मी.

....................................................
संजय घाडगे - लातूर
9834571536