१.
काळोखाला लावून प्रकाशाचे छत मी
देतो आहे सूर्याला थोडी सवलत मी
वाट निसरडी तृष्णेची ना कधी घसरलो
सम्यक ज्ञानाची केली आहे संगत मी
स्वच्छ आरसे डोळ्यांमध्ये रोवले जरी
समजण्यास माणूस मात्र केली गफलत मी
काळजातला गुपीत कप्पा उघडून दिला
माझ्या हाताने माझी केली फसगत मी
अश्रू टिपले सर्वांचे सरणावर माझ्या
आयुष्याची घेऊन निघालो मिळकत मी
काळजात काळीज पेरतो माणसा तुझे
जेवाया देतो माणुसकीची पंगत मी
अंधाराची तमा कधीही नाही केली
सूर्यासोबत जर केली सल्ला मसलत मी
२.
श्वास जुने हृदयात गवसले मला अचानक
दोस्त सुगंधी पुन्हा भेटले मला अचानक
बंड नेहमी करतो जेव्हा जुलूम होतो
म्हणून त्यांनी आज टाळले मला अचानक
बुडणाराला पाहुन जेव्हा हासत होतो
काठाने पाण्यात ढकलले मला अचानक
गरिबांमध्ये मंदिरातले दान वाटले
स्वप्न केवढे सुंदर पडले मला अचानक
सहज सुखाने म्हटले घडिभर येऊ का मी
अन् दुःखाने मिठीत धरले मला अचानक
डोळ्यांमधले पाणी पाजू का शेताला
मेघांनी डिवचून रडवले मला अचानक
तुझा जीवना पत्ता घेउन सुगंध आला
पण वाऱ्याने पुन्हा चकवले मला अचानक
यादी माझ्या विरोधकांची फुगली आहे
नाव तळाशी माझे दिसले मला अचानक
कुठे हरपला निशांत केला तूच गवगवा
मीच तुझ्या हृदयात शोधले मला अचानक
३.
हसले सारे लोक मला चुकल्यावर मी
खजील झाले ते वेडे कळल्यावर मी
नकोस फोडू, स्वच्छ आरसा आहे मी
होइल आधी जखम तुला टिचल्यावर मी
हंबरडा फोडुन सृष्टी मेघास म्हणे,
''व्यर्थ तुझे हे पाझरणे सुकल्यावर मी ''
माझ्या दारी उजेड करतो रखवाली
तृष्णेच्या अंधाराला पिळल्यावर मी
कट रचून जिंकण्याची चटक जरी तुला
मिळवशील कसली दौलत हरल्यावर मी
खूप दिसांनी शांत झोपलो आयुष्या
उरी व्यथांना अलगद जोजवल्यावर मी
माणुसकीला ज्या वैऱ्यांनी पेटवले
पळून ते गेले ठिणग्या गिळल्यावर मी
खूप वाहवा झाली माझी आज इथे
या बगळ्यांना राजहंस म्हटल्यावर मी
काठावरचे डोळे का हासले मला
मोहाच्या डोहामध्ये बुडल्यावर मी
...................................................
