१.
थांगपत्ता लागला नाही थडीला
नाव त्याची लागली देशोधडीला
भरकटत कोठून कोठे नाव गेली
लागला अंदाज नाही त्या घडीला
भेटणारा सारखा उपदेश करतो
काय मग किंमत निरर्थक बडबडीला
वाचवू शकतो कुणाचे प्राण मीही
दे जराशी साथ माझ्या धडपडीला
वादळाने मोडल्या होत्या डहाळ्या
झाड नाही विसरले त्या पडझडीला
२.
जीव या देहातला भाडेकरी
वेगळ्या राहू नका आशेवरी
मी प्रकर्षाने विठोबा बोललो
ऐकले हे शब्द मी जात्यावरी
आसरा ज्याला दयेखातर दिला
शेवटी झालाच तो दावेकरी
ना गजर,ना गलबला, गमनागमन
का कळेना ओस पडली ओसरी
वाचली नाना रुपे देवा तुझी
भेटला साक्षात तू कुठल्या घरी
ऐकलेले शब्द होते वेगळे
केवढी जालीम होती वैखरी
...................................................
जयप्रकाश सोनूरकर,
शीतल मंगल कार्यालय समोर , मानस मंदिर ,बॅचलर रोड ,वर्धा
जि.वर्धा
मो.९७६५५४७९४०
