१.
दिली फारकत दुःखाला अन् आनंदाने जगते मी
दुनियादारी मागे सारुन कर्म चांगले करते मी
कधीच नाही निराश झाले संकट मोठे आल्यावर
शांत मनाने विचारपूर्वक शब्द-लढाई लढते मी
थकवा आला आयुष्याला पाय थांबले जागेवर
पंख मनाला लावुन घेते बसल्या जागी उडते मी
काळ निसटला हातुन माझ्या हेही कळते मला तरी
काळासोबत करून मैत्री भविष्य उज्ज्वल जपते मी
अंधाराच्या वाटेवरती चंद्र सोबती असताना
साथ दिव्याची देता देता उजेडातही जळते मी
२.
बघता बघता रद्दी झाली सुंदर स्वप्ने
कचऱ्यामध्ये मला भेटली नंतर स्वप्ने
विदूषकाच्या भुमिकेसाठी तयार होती
आयुष्याच्या सर्कशीतली जोकर स्वप्ने
गोड, गोजिरे स्वप्न सुखाचे रोजच बघते
पेरत असते रात सावळी घरभर स्वप्ने
पोटाच्या खळग्यात पेटते आग भुकेची
डोळ्यांमध्ये सतत पाहते भाकर स्वप्ने
स्वातंत्र्याच्या गप्पा टप्पा रमल्या होत्या
हातामध्ये प्रत्येकाच्या गाजर स्वप्ने
आशेच्या किरणात उगवते पहाट जेव्हा
किरणांसोबत हासत आली ढिगभर स्वप्ने
धुराडलेल्या आभाळाला दिसली नाही
काळोखाच्या पंखाखाली धूसर स्वप्ने
३.
जीवनाची वाट शोधत चालता येते
संकटाच्या साखळीला तोडता येते
देव गाभाऱ्यातला गरिबामधे असतो
पायरीवर रोज त्याला भेटता येते
अंबराशी स्वप्नझोका रोज बांधावा
ध्येय आयुष्यातले मग गाठता येते
चांगल्या कार्यास येतो गंध कर्माचा
अत्तराच्यासारखे गंधाळता येते
मी कधी गेलेच नाही तिर्थ यात्रेला
माय बापालाच दैवत मानता येते
मी स्वतःच्या ठेवते लपवून जखमांना
वेदनेमध्ये मलाही हासता येते
हुंदके, अश्रू, उसासे,यातना, दुःखे
शांततेने दूर यांना लोटता येते
...................................................
रजनी निकाळजे
(शब्द रजनी)
