१.
तुझ्या श्वासांसवे जळलो, सुगंधी धूर झालो मी
तुला ओवाळले रात्री, तुझा कापूर झालो मी
तुझा गजरा, तुझी वेणी, तुझ्या ओठांतली साखर ;
मधाचा घोट घेण्याला किती आतूर झालो मी
यमन रेंगाळला गात्री, ललित विस्तारला नंतर ;
सुखाच्या भैरवीमधला विवादी सूर झालो मी
लयीला देह अडखळला समेवर थरथरे काया
विलंबित नाद ओसरला मिठीतुन दूर झालो मी
कशी शब्दांत बांधू मी तुझ्या माझ्यातली कविता
उरी कल्लोळ शब्दांचा मुका काहूर झालो मी
तुझ्याशी जिंकणे ही हार होती शेवटी माझी
लढाई हारलो नाही स्वतःहुन दूर झालो मी
२.
व्यथा गोंजारली होती,मरण कवटाळले होते
तुला मी टाळले नव्हते,स्वत:ला जाळले होते
मुक्याने आसवे तेव्हा,फुलांनी गाळली होती
कळ्या अस्वस्थ होत्या अन् , दगड ओशाळले होते
जगाच्या थंड नजरांनी किती सर्दाळलो होतो
तुझ्या उबदार स्पर्शांनी मला सांभाळले होते
लगे तू बातमी केली,तुझ्या निर्दोष असण्याची
तिथेही नाव माझे तू , खुबीने टाळले होते
तसा जगतोच आहो मी, स्मृतींचे मोगरे घेउन,
तुझ्या श्वासात प्रेमाने, कधी जे माळले होते
किती रागावली होती, ऋतूंच्या वागण्यावरती
तुला ठावूक नव्हते ते, तुझ्यावर भाळले होते
मला वादाखिलाफीचा नको ना टोमणा मारू
जगाचे कायदे तेव्हा,मनाने पाळले होते
३.
दिखाव्याचा जगाला या जुना आजार आहे ना
जरासे प्रेम वरवरचे पुढे व्यवहार आहे ना
पिऊनी वादळी लाटा किनाऱ्याला म्हणाली ती
झुळुक हळुवार श्वासांची किती उबदार आहे ना
नदीने श्लोक बुडवावा ध्वनींच्या संगमावरती
तुझ्या डोळ्यांतली तृष्णा तशी लयदार आहे ना
कुण्या शाळेत शिकलिस तू अचुक मापे अशी चिमणे
तुझा वाऱ्यावरिल संसार नक्षीदार आहे ना
कुण्या ध्यानस्थ योग्याचा जुना पिंपळ म्हणाला की
तुझ्या आत्म्यास करुणेचे निरामय दार आहे ना
कशाला राउळी आलो तुला मी भेटण्यासाठी
तुझे अस्तित्व शून्याचे नभाच्या पार आहे ना
....................................................
