Showing posts with label डॉ पवन कोरडे. Show all posts
Showing posts with label डॉ पवन कोरडे. Show all posts

तीन गझला : डॉ. पवन कोरडे

 



१.


ऐकवतो मी ज्योतिषराजा, हृदयामधला रडका स्वर

तळहाताच्या रेषांवरती, चालत नाही माझे घर


येते अर्भक जन्माला जर, नवसाने, हे शिवशंकर

शुक्राणूला अन् डिंबाला, जाऊ दे तू सुट्टीवर 


अस्तित्वाच्या अस्तित्वावर, अस्तित्वाची अस्तित्वे

कोणी असतो उंदिर येथे, कोणी अजगर ताकदवर


मित्रांसाठी मधुशय्या मी, गद्दारांसाठी खंजर

तू प्रेमाच्या शेतीसाठी, चालव माझ्यावर नांगर


ते मखमलचे आसन दे तू, कुठल्याही बेडूकाला

पण त्याला सुखदायक वाटे, नाला अन् जमिनीचा चर


मुंग्या अलगद राणीसाठी, झिजल्या आणिक मेल्याही

जगण्यास्तव जीवन कवकाने, केला इतरांचा वापर


मी का या दुनियेला माझे, हे व्रण जखमांचे दावू

ही दुनिया तर आली नव्हती, माराया त्यावर फुंकर


पाण्यासाठी निघतो आहे, का तुमचा घागरमोर्चा

टपकत असतो नळ नुसता तो, भरल्यानंतरही घागर


माझ्या या एकाकीपणवर, हसणार्‍यांनो सांगा रे

जळतो का कोणी? कोणाच्या प्रेतासोबत सरणावर


हसतो एकामेकांवरती, आपण जीवन जगताना

जीवन हे मज सर्कस वाटे, आपण सगळेजण जोकर


२.


मगरी-अश्रूवर रडणे व्यवहारिक नाही

इतके कनवाळू असणे व्यवहारिक नाही


ज्या झाडाची सलगी कडकडत्या बिजलीशी 

त्या झाडाखाली निजणे व्यवहारिक नाही


मैत्री ही निभवावी मोजायाची नाही

मैत्री व्यवसायिक बनणे व्यवहारिक नाही 


त्यांच्या हृदयामधुनी अश्रू वाहत असता

तुमचे डोळयांनी हसणे व्यवहारिक नाही 


ओळख व्हावी अपुली अपुल्या सत्कर्माने

दुष्कर्माने ओळखणे व्यवहारिक नाही  


जर ना बुद्धीमध्ये बळ ना दृष्टित वादळ 

तर स्वप्नांमागे पळणे व्यवहारिक नाही 


खैरातीची किंमत नाही परवडणारी

हे खैरातीवर जगणे व्यवहारिक नाही 


या ठरलेल्या वेळी भेटू म्हटल्यानंतर 

वेळेवर ना पोहचणे व्यवहारिक नाही


या गझलेच्या सुंदर संमेलनात तू रे

ही चारोळी ऐकवणे व्यवहारिक नाही


३.


पोहणे ना माहिती असता तरावे लागले

काय जीवन? सांगण्यासाठी मरावे लागले


हारण्याला मोल माझ्या सांगतो आले कसे

हृदय जिंकायास हृदयाला हरावे लागले


सुत्र माझ्याही सुखाचे हे असू शकते गड्या

जीवनाशी रोज समझौते करावे लागले


चूक माझी होत नाही वागताना नेहमी 

पण तुझ्यासाठी चुकीचे मज ठरावे लागले


टांगुनी ठेवू कुठे साधेपणा मी सांग रे 

आज इतरांचे मला उसणे भरावे लागले

....................................................