'अनुष्टुभ्' व 'कवितारती' सारख्या दर्जेदार
नियतकालिकांचे निकटवर्ती तसेच साक्षेपी समीक्षक प्राचार्य म.सु. पाटील, कुसुमाग्रज-बोरकरांसारख्या दिग्गज कविवर्यांचा सहवास लाभलेले प्रतिभावान कलावंत, सुलेखनकार कविवर्य, गझलकार खलील मोमीन यांचा तजेलदार ताजा गझलसंग्रह पुण्याच्या संस्कृती प्रकाशनामार्फत प्रकाशित झाला आहे. यापूर्वी त्यांचे 'निरालय' व 'अक्षराई' हे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत.
'कुंकवाचे कुंपण ' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा कोल्हापूरच्या 'गझलसाद ' समूहाच्या व्यासपीठावर समारंभपूर्वक संपन्न झाला. ही घटना मराठी गझलविश्वात निश्चितच चैतन्य निर्माण करणारी आहे.
"कुंकवाचे कुंपण" या गझलसंग्रहात एकूण १०८ गझला समाविष्ट असून संग्रहाचे कलात्मक मुखपृष्ठ रेखाटन व संपूर्ण सुलेखन स्वत: गझलकार खलील मोमीन यांनी केले आहे, हे ह्या गझलसंग्रहाचे वैशिष्ट्य प्रथमत:च नजरेत भरते.
संग्रहात सुरुवातीस सुदर्शन फाकिर यांचा -
'किसी रंजीश को हवा दो के मैं जिंदा हूॅंं अभी;
मुझको एहसास दिला दो के मैं जिंदा हूॅं अभी '
हा मतला व दोन शेर तर पुढे कविवर्य बा.भ.बोरकरांची -
'रिक्ततेवाचून येथे मुक्ति नाही वेगळी
प्रीतिचा माते मळा ती आपली गंगाजळी ! '
ही सुंदर मराठी द्विपदी दिलेली आहे.
पुस्तकाचा गझलसंग्रह असा उल्लेख असला तरी संग्रहात एकशे पाच गझला संग्रहित असून तीन गझलेतर रचना अशा एकूण १०८ रचना समाविष्ट आहेत.
खलीलजींच्या गझल रचना या संवेदनशीलतेतून उतरल्या असल्याने त्या अभ्यासपूर्ण, विचारप्रवर्तक, चिंतनगर्भ व आशयघन अशा आहेत. त्यांमध्ये सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय अशा जीवनविषयक विविध संमिश्र विषयांवर चिंतनशील भाष्य आढळते. मानवी जीवनमूल्यांची पाठराखण करणा-या शेरांनी ती विनटली आहे. साहजिकच शेरांमधून व्यक्त झालेला आशय मनात रेंगाळत राहतो आणि हेच त्यांचे यश आहे. खलीलजींचा मराठी भाषेचा शब्दसंचय, लेखनशुचिता, व्याकरण इ. बाबींचा व्यासंग विविध रचनांमधून प्रत्ययास येतो. त्यांची काव्यविषयक जाणीव व अभ्यास प्रगल्भ असल्याने त्यांचे शेर मनाची पकड घेतात. विविध वृत्तांमध्ये अवतरलेल्या त्यांच्या गझलांतील यमके (कवाफी) व अंत्ययमके (रदाफी) वैशिष्ट्यपूर्ण अशी योजिलेली दिसून येतात. निसर्गविभ्रम, राष्ट्रनिष्ठा, मानवी सलोखा, बंधुभाव व समानता, जीवनातील विसंगती आदींबाबतच्या भल्याबुऱ्या मानवी प्रवृत्तींवरील त्यांची निरीक्षणे व सत्प्रवृत्तीविषयीची त्यांची आस्थाही गझलांमधून डोकावत राहते.
संग्रहातील काही उल्लेखनीय शेर उद्धृत करण्याचा मोह आवरता येत नाही. ते खालीलप्रमाणे -
'मानवाचे वस्त्र आहे शस्त्र नाही धर्म हा;
फाडुनी आम्हीच केली लाख त्याची लक्तरे'
'जीवनाचे श्रोत श्रद्धा, प्रेम, माया ती दया;
श्रोत सारे आटले ते कोरडे झाले झरे'
'खरे काय खोटे इथे पारखावे;
जिणे रोजचे ही खरी कार्यशाला'
'धर्म, जाती, पंथ ही वैविध्यता पाळली आहे जरी समाजाने;
ऐक्य जोपासीत आली नेहमी माणसे ती त्यातली महत्त्वाची '
'लाभ नेहमी भला वाटतो येथे तेथे;
रीघ लागता घरी व्यथांची फिरते माथे'
'कातळाला कोरते ती दिव्यदृष्टीही हवी;
शिल्प होते त्यामुळे निर्माण लेण्यासारखे '
'माजलेला स्वार्थ करतो गोड नात्याला निकामी;
जोडुनी ते इष्ट करणे हे खरे कौशल्य आहे '
'मानिनी आहे गझल ती पाहुनी तोऱ्यात जाते;
त्या तिला आकृष्ट करणे हे खरे कौशल्य आहे!'
'चाहूल घेत असते मन सारखे कुणाची;
तेव्हा खट्याळ जातो ढकलून दार वारा!'
'ऐशी शहारते ती विरतात शब्द ओठी;
तेव्हा तिच्या उराची होतो सतार वारा!'
'होताच कोंडमारा मदतीस धावणा-या;
त्या धीट अक्षरांचे होतात पाय गझला'
'विपरीत पाहताना मन खिन्न सुन्न होते;
उद्रेक शमविणारा असतो उपाय गझला'
'प्रीती, व्यथा, उसासे, करुणा तसे दिलासे;
स्फुरणार काय सांगा यांच्याशिवाय गझला?'
'कवळून आशयाला निघतात त्या स्वरांना-
ओठात घोळताना होतात साय गझला!'
या संग्रहातील असे अनेक शेर मनात घर करून अंतरात निनादत राहतात. असा हा सर्वांगसुंदर संग्राह्य गझलमेवा समरसतेने आस्वादण्यातच खरी मौज आहे, हे नि:संशय!
....................................................
पुस्तकाचे नाव : कुंकवाचे कुंपण
गझलकार: खलील मोमीन
प्रकाशक : संस्कृती प्रकाशन, पुणे
पृष्ठे : १२२
मूल्य : २०० रुपये
-अशोक वाडकर,
कोल्हापूर
मो.७०२००११४०८
