Showing posts with label मसूद पटेल. Show all posts
Showing posts with label मसूद पटेल. Show all posts

तीन गझला : मसूद पटेल

  





१.


नावासमोर माझ्या जर जात चिकटली नसती 

माझी गझल जगाला अजिबात खटकली नसती


सोशिक हवेस कोणी जर फूस लावली नसती 

राखेमधील ठिणगी परतून भडकली नसती 


ऋतुचक्र जर ठराविक हातात राहिले असते 

बरसातही ठराविक शेतात बरसली नसती 


पिंपळ मनात आपण जर काल राखला असता 

संतान आज अपुली छायेस तरसली नसती 


स्पर्धेत धावण्याच्या हमखास जिंकला असता

कुबडी मनामधे जर तू खोल रुजवली नसती 


इतिहास भिन्न थोडा नक्कीच राहिला असता

नावे खरी कुणी जर त्यातून वगळली नसती 


आजन्म या रुढींच्या घाणीत भटकलो असतो 

जर वाट गौतमाची आम्हास गवसली नसती 


२. 


जो अहिंसेची जगाला आज दीक्षा देत आहे 

वाचुनी इतिहास त्याचा प्राण कंठी येत आहे 


नफरतींची स्फोटके आहेत जेथे पेरलेली 

मार्गदर्शक का अम्हाला त्याच मार्गी नेत आहे  ?


भर उन्ही आहे पहुडले नेमके रस्त्यावरी जे 

कोण जाणे ते कुण्या बेवारशाचे प्रेत आहे 


सोंग लोकांनी मुक्याचे घेतले आहे तरीही  

झोपडी जळकी गवाही ओरडोनी देत आहे


मारणारे तर बिचारे पार विस्मरणात गेले 

खून माझा आजही पण सारखा चर्चेत आहे 


एवढी झाली विषारी आज ही निर्मळ हवा की 

शेवटाचा श्वास आता भाइचारा घेत आहे 


' बी जसे तैसी फळे ' हा ठाम सृष्टीधर्म असता 

द्वेष पेरोनी तुला मग प्रेम का अभिप्रेत आहे ?


३.


जशा लेखण्या सत्य बोलल्या

सर्व कोठड्या सज्ज जाहल्या


सुज्ञ फुलांना कळले आहे

बागा इथल्या कुणी जाळल्या


रात्र अचानक उदास झाली

खिन्न तारका कुणी माळल्या 


रामराज्य घेउन येणाऱ्या

नद्या मधातच कुठे आटल्या  


विका अम्हा पण इतुके सांगा

किमती अमुच्या किती लावल्या 


त्या शेताला कसला वाली

चोर बसवला जिथे जागल्या


अशा घडी तू चुप बसला तर 

क्षमा न करतिल पिढ्या धाकल्या

....................................................