१. प्रास्ताविक :
आपले म्हणणे थोडक्यात, प्रभावीपणे व चटकदारपणे मांडण्यासाठी, कधी जीवनाचे चिरंतन सत्य, तत्व सांगण्यासाठी, कधी समाज प्रबोधन करण्यासाठी तर कधी समाजाच्या वैगुण्यावर प्रहार करण्यासाठी म्हणी व वाक्प्रचारांचा उपयोग केला जातो. आपल्या भावना गझलेच्या शेरामध्ये मांडताना आपल्याला नेमकी हीच गोष्ट साधायची असते. त्यामुळे व्यंगोक्ती, नाट्यमयता, विरोधाभास, धक्कातंत्र ही गुणवैशिष्ट्ये असलेल्या म्हणी व वाक्प्रचार शेरात वापरल्याने शेराचीही लज्जत वाढते व चपखलपणे मांडणीही साध्य होते. म्हणी व वाक्प्रचारांचा उपयोग स्त्रिया रोजच्या भाषिक व्यवहारामध्ये अधिक प्रमाणात करताना आढळतात. साहजिकच स्त्रियांच्या गझलेतही म्हणी व वाक्प्रचार अधिक प्रमाणात प्रतिबिंबित होताना दिसतात.
२. म्हणी व वाक्प्रचार यांचा वापर असलेले स्त्रियांचे शेर:
काही स्त्रीगझलकारांच्या शेरांच्या माध्यमातून कोणत्या म्हणी व वाक्प्रचारांचा वापर स्त्रीगझलकारांनी कसा केलेला आहे ते पाहूया-
ललिता बांठिया यांच्या पुढील शेरामध्ये 'सरड्याची धाव कुंपणापर्यंत' या म्हणीचा वापर केलेला दिसून येतो-
'निषेध खलिते, मोर्चे, फलकही लावा बदनामींचे
'सरड्यांची' कुंपणापर्यंतच असते मोठ्ठी धाव' (साद-प्रतिसाद पृ.२८)
हीच म्हण दीपमाला कुबडे यांनी खालील द्विपदीमध्ये वापरलेली आहे-
'स्पर्धेत धावण्याचा आटापिटा कशाला
कुंपणापर्यंतच सरड्याची धाव आहे' (दीपमाळ गझलांची, पृ.४३)
‘सूप वाजणे’ हा वाक्प्रचार डॉ. सुनंदा शेळके यांनी आपल्या खालील द्विपदीमध्ये वापरलेला आहे-
'जून येता पास होते मार्क्स मिळवून चांगले
आमच्या गुणपत्रकाचे सूप तेव्हा वाजते' (गजलगंध, पृ.३०)
फातिमा मुजावर यांच्या पुढील दोन्ही द्विपदीमध्ये 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' या म्हणीचा वापर केलेला दिसून येतो-
'साऱ्या जगताचे ऐका
वागा तुमचे ज्ञान जसे' (रोशन, पृ.१८)
तसेच हाही शेर पहा-
'जगास ऐकून करी मनाचे
अनुभव जो तो गुरु खरा रे' (रोशन, पृ.३०)
'भिंतीलाही कान असतात' ही म्हण फातिमा मुजावर यांनी पुढील द्विपदीमध्ये वापरलेली दिसून येते.
'का ऐकावे कोणी गुपित असे फातिमा
हे काय कुणी सांगावे? भिंतीला कान होते' (‘पान मनाचे’,पृ.१३)
फातिमा मुजावर यांच्या पुढील दोन्ही द्विपदींमध्ये 'दूध पोळल्यावर ताक फुंकून पिणे' हा वाक्प्रचार वापरलेला दिसून येतो-
पहा-
'वास्तवाने आज जगणे शिकल्यावर
ताकही फुंकून मीच पिणार आहे' (‘पान मनाचे’पृ.४१)
तसेच
'पोळल्यावर ताकही फुंकून प्यावे
हे असे चटके म्हणाला बसत गेले' (‘पान मनाचे’, पृ.५९)
'ऋण काढून सण साजरा करणे' हा वाक्प्रचार फातिमा मुजावर यांनी पुढील द्वीपदीमध्ये वापरलेला आहे-
'ऋण काढण्याशिवाय पर्याय ना उरे
सण साजरा कराया झटतात माणसे' (‘मोरपंखी गझल’, पृ.६१)
संध्या पाटील यांचा हा शेर पहा-
भेट स्वप्नी तू म्हणाला टेकते आभाळ जेथे
बघ तुझ्यासाठीच पडले वाकडे पाऊल माझे' (‘दीपकळी’, पृ.९१)
इथे 'पाऊल वाकडे पडणे' या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला दिसून येतो.त्यांनीच
'कातड्याचे जोडे करून घालणे' हा वाक्प्रचार पुढील द्विपदीमध्ये वापरलेला आहे-
'कातड्याचे करून जोडे घातले पायात ज्यांच्या
बेरकी ते लोक सारे लागले मज ठोकराया' (‘दीपकळी’, पृ.९३)
संध्या पाटील यांनी पुढील द्विपदीमध्ये 'लाथ मारीन तिथं पाणी काढीन' हा वाक्प्रचार वापरलेला दिसून येतो-
'जिथे लाथ मारीन काढीन पाणी
उभा जन्म मी ठोकरावा कशाला' (‘गंधकोष’,पृ.६७)
त्यांचाच हा पुढील शेर पहा-
'सभेत कृष्ण धावला बघून ती विटंबना
गिळून मूग भीष्मही बघे अधर्म सोहळा' (‘गंधकोष’,पृ.७६)
'मूग गिळून गप्प बसणे' हा वाक्प्रचार उपरोक्त द्विपदीमध्ये वापरलेला दिसून येतो. संध्या पाटील यांचाच हा शेर पहा-
'खट्याळ दैव दाविते अशाच रोज वाकुल्या
जिथे जिथे फुलेन मी तिथेच ठोकते खिळा' (‘गंधकोष’,पृ.७६)
वरील द्वीपदीमध्ये ‘खिळा ठोकणे’ किंवा ‘मेख मारणे’ असाही समानार्थी वाक्प्रचार आहे. अनेकदा सांगूनही काही व्यक्ती ऐकत नसतील तर अशा व्यक्तींच्या बाबतीत 'कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं' ही म्हण वापरली जाते. स्त्रीभ्रूण हत्या सारख्या विषयावर सरकारतर्फे जनजागृती केली जाते; परंतु लोक त्यांच्या विचारात सुधारणा करत नाहीत, असे पुढील द्विपदीमध्ये प्राजक्ता पटवर्धन यांना म्हणावयाचे आहे-
'जागृती करतात हत्या रोखण्या गर्भातली
पण खरे की श्वान शेपुट वाकडे ते वाकडे' (‘मौनाची आर्जवे’,पृ.१७)
प्राजक्ता पटवर्धन यांच्या खालील दोन द्विपदी पहा-
'दुसऱ्याचा तो कार्टा म्हणती
अपुली पोरे नटखट सारी
खात कोंबडी ताव मारून
वातड म्हणती... हलकट सारी !' (’मौनाची आर्जवे’, पृ.२१)
उपरोक्त द्विपदीमध्ये अनुक्रमे 'आपलं ते पोर अन् दुसऱ्याचं ते कार्टं' तसेच 'कोंबडी खायची ते खायची, वरून वातड म्हणायची' अशा दोन म्हणींचा वापर केलेला दिसून येतो. हीच म्हण डॉ.माधुरी चव्हाण जोशी यांची ही द्विपदी पहा-
'किती रक्त आटवते तरिही आई करते काय कुठे?
शेळी जाते जिवानिशी अन् वातड म्हणतो खाणारा'
' 'मला पहा, फुले वहा!' असेच वागणे तुझे
कथून सत्य मी सदाच अडचणीत राहिले!' (’मौनाची आर्जवे’,पृ.२७)
इथे 'मला पहा, फुले वहा!' किंवा 'माझ्याकडे पहा अन् पानफुलं वहा' ही म्हण वापरलेली आहे. त्यांचाच हा शेर पहा-
'अती परिचयातून होते अवज्ञा...
तुझ्या पास येणे म्हणुन टाळते मी !' (’मौनाची आर्जवे’,पृ.६१)
वरील द्विपदीमध्ये प्राजक्ता पटवर्धन यांनी 'अती परिचयात अवज्ञा' ही म्हण वापरलेली दिसून येते.
'पहा ऐकले मी जनाचे परंतू, मनाच्याच रंगात मी रंगले
तरी जाहली वाटते का मनाची नव्याने पुन्हा आज धुळवड किती' (’मौनाची आर्जवे’,पृ.१००)
ह्या द्विपदीमध्ये प्राजक्ता पटवर्धन यांनी 'ऐकावे जनाचे करावे मनाचे' ही म्हण वापरलेली दिसून येते. बरेच काही घडून गेल्यानंतर आपण म्हणतो 'एव्हाना पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे' ह्या म्हणीचा वापर मीनल बाठे यांनी पुढील द्विपदीमध्ये केलेला दिसून येतो.
'किती वाहुनी, गेले पाणी, पुलाखालुनी
कसे अचानक आज पुन्हा अवतरले वादळ' (‘स्वानंदस्वर', पृ.२६)
हीच म्हण सुप्रिया जाधव यांच्या पुढील द्वीपदीमध्येही दिसून येते-
'बघत बसले उडी मारायचे राहून गेले
पुलाखालून पाणी केवढे वाहून गेले' (‘कोषांतर’,पृ.१०४)
मीनल बाठे यांचा हा शेर पहा-
'उथळ पाण्यालाच असते फार खळखळ हे खरे
मीच मोठा शाहणा, म्हणतात काही माणसे'
'मृगजळाचा मोह फसवा, ज्या मुळी ना उमगतो
हातचे सोडूनिया पळतात काही माणसे' (‘स्वानंदस्वर',पृ.३७)
'उथळ पाण्याला खळखळाट फार' व 'हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागणे' या दोन म्हणींचा वापर वरील द्विपदींमध्ये केलेला दिसून येतो. निर्मला सोनी यांचा हा शेर पहा-
'कुणी नाही कुणाचे रे जगाला सांगते आहे
जसे दिसते तसे नसते मनाला सांगते आहे'
(‘तू गुंतला असा की’,पृ.५)
वरील द्विपदीमध्ये उला मिसऱ्यामध्ये 'कोणी नाही कुणाचे, जग दिल्या घेतल्याचे' ही म्हण तसेच सानी मिसऱ्यामध्ये 'दिसते तसे नसते, म्हणून जग फसते' अशा दोन म्हणींचा वापर केलेला दिसून येतो. त्यांचाच हा शेर पहा-
'जीवन सुखातले हे, झाले कसे विषारी,
पाणी कुठे तरी बघ, मुरतेय खोल आता' (‘तू गुंतला असा की’,पृ.१२)
'पाणी मुरणे' म्हणजे 'गुप्तकट शिजत असणे' अशा अर्थाचा हा वाक्प्रचार वरील द्विपदीमध्ये वापरलेला आहे. सुप्रिया जाधव यांच्या एकाच गझलेतील ह्या पुढील तीन द्विपदीमध्ये तीन म्हणी/वाक्प्रचार दडलेले आहेत, पहा-
'घाव छातीवर कितीही झेलले असते तुझे
सांग ना उपसू कसा खंजीर हा पाठीतला ?
एकतर दुष्काळ त्यातुन मास तेरावा सुरू
फार काही देत नाही घास घे घासातला
पाय रोवावे जिथे तेथील वाळू सरकते
श्वास घे ओढून आणिक लाग तू पोहायला' (‘कोषांतर’,पृ.२०)
पहिल्या द्विपदीमध्ये 'पाठीत खंजिरी खुपसणे' असा वाक्प्रचार वापरलेला दिसून येतो. दुसऱ्या द्विपदीमध्ये 'दुष्काळात तेरावा महिना' ही म्हण वापरलेली दिसून येते. तिसऱ्या द्वीपदीमध्ये 'पायाखालची जमीन खचणे' म्हण वापरलेली दिसून येते. सुप्रिया जाधव यांचा हा शेर पहा-
'जुनाट जखमेवरची खपली निघते आहे
काळाचे औषध कुचकामी ठरते आहे' (‘कोषांतर’,पृ.५४)
'काळ हेच सर्व समस्या वरील औषध आहे' या म्हणीचा संदर्भ इथे दिसून येतो. तसेच 'छत्तीसचा आकडा असणे' म्हणजे परस्परांत न पटणे या अर्थाचा वाक्प्रचार सुप्रिया जाधव यांनी पुढील शेरात वापरलेला दिसून येतो-
'आकडा तुझ्याशी छत्तिसचा सौभाग्या
पण दुर्भाग्याशी गणित बरोबर जमले' (‘कोषांतर’,पृ.९२)
'घर फिरले की वासेही फिरतात' ही म्हण सुनीती साठे यांनी कशी वापरलीय पहा-
'घाव होते खोल झाले, जखम होती ही मनाला
घर फिराया लागल्यावर तो तसा फिरणार वासा' (’गझल गुंजारव’,पृ.१०)
सुनंदा पाटील यांचा 'सुक्याबरोबर ओलेही जळते' ही म्हण वापरलेला हा शेर पहा-
'कशास मांडू चूल त्रिकोणी उरात वणवा पेटत आहे
ओल्यासंगे सुके जळावे हे कोणाला टळले नाही' (‘माझा विचार आहे’,पृष्ठ ७०) सुनंदा पाटील यांनी या म्हणीची 'ओल्याबरोबर सुके जळते' अशी उलट मांडणी केलेली दिसते. 'खेळखंडोबा होणे' हा वाक्प्रचार वापरलेली राधिका प्रेमसंस्कार यांची ही द्वीपदी पहा-
'खेळखंडोबा पुरा झाल्यावरी
गोंधळ्याने ताल धरलेला नवा' (‘मी अस्सल प्रत जन्माची’,पृष्ठ ६३) त्यांचीच ‘प्रेम उतू जाणे’ हा वाक्प्रचार असलेली ही द्विपदी पहा-
'अगोदर नावही माझे कुणाला माहिती नव्हते
अचानक जीव माझ्यावर कसा त्यांचा उतू जावा' (‘मी अस्सल प्रति जन्माची’,पृष्ठ ६९)
डॉ.स्नेहल कुलकर्णी यांचे हे काही प्रकाशित/अप्रकाशित शेर पहा-
'शिकले पण कळले नाही यातील चांगले कुठले
ऐरावत इंद्राचा की शामभटाची तट्टाणी'
'कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शामभटाची तट्टानी' ही म्हण इथे दिसून येते. तर खालील दोन शेरात अनुक्रमे ‘तळ्यात मळ्यात’ आणि ‘नर्मदेतले गोटे’ असे वाक्प्रचार दिसून येतात.
'बापा अखंड माझे धरलेस बोट तेव्हा
थोडी तळ्यात मी अन् थोडी मळ्यात होते'
'जणू नर्मदेचे कळाहीन गोटे तशी म्लान पडतात हातामधे
किरण भेटल्यावर 'दिशा'.. सप्तरंगी घडवतात जादू तुझी लोलके'
स्नेहल यांचाच ‘गोंडा घोळणे’ वाक्प्रचार असलेला हा शेर पहा-
'जीव खाउनी मी पक्षाचा ताशा बडवत आहे
विरोधकांच्या पुढ्यात सत्ता गोंडा घोळत आहे' (‘स्नेहांकित’,७२)
डॉ.माधुरी चव्हाण-जोशी यांचे हे काही अप्रकाशित शेर पहा-
'हे कसे पटणार, मी आहे तुझ्या बाजूने?
मारल्यावर गाय तू, मी वासरू मारू का'
'कुणी गाय मारली म्हणून आपण वासरू मारायचं का?' ही म्हण वरील शेरात दिसून येते. तर 'पालथ्या घड्यावर पाणी' ही म्हण त्याच्याच पुढील शेरात दिसून येते-
'कोणी समजावले तरी समजून घ्यायचे नसते,
धारेखाली पाण्याच्या पालथा घडा तू म्हणजे'
'टोचुन बोलले पण खंत केली नव्हती,
कावळ्यांचे शाप होते, गाय मेली नव्हती'
डॉ. माधुरी यांनी 'कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही' ही म्हण इथे वापरलीय तर 'बैल गेल्यावर झोपा करणे' ही म्हण पुढील शेरात दिसून येते-
'परजले शस्त्र तू नंतर, तुझ्यावर मात केल्यावर,
करुन चालेल का रे सांग झोपा, बैल गेल्यावर?'
'घाबरुन पळशील कोठे अन् किती तू
लागतो पाठी भित्याच्या ब्रह्मराक्षस'
डॉ.माधुरी यांनीच 'भित्यापाठी ब्रह्मराक्षस' ही म्हण वरील शेरात वापरलेली आहे. तर 'तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणे' ही म्हण त्यांनी पुढील शेरामध्ये वापरलीय-
'पाऊल चुकीचे कुठलेही, टाकण्याअगोदर विचार कर,
तळहातावर फोड जपावा तसे तुला मी जपते आहे'
डॉ. माधुरी चव्हाण जोशी यांच्या 'मराठी गजलांचा मधुघट' या गझल संग्रहामधील या काही द्विपदी पहा-
'ससा हाती असे ज्याच्या ठरे तो पारधी येथे,
नव्याने खेळणाऱ्याला नियम साधा कळत नव्हता' (पृ.६९)
'कालचा गोंधळ बरा हे माहिती आहे तरी पण,
गाढवाला आज गीता चल पुन्हा सांगून पाहू' (पृ.७६)
उपरोक्त द्विपदींमध्ये अनुक्रमे 'ज्याच्या हाती ससा तो पारधी' आणि 'गाढवापुढे वाचली गीता अन् रातचा गोंधळ बरा होता' ह्या दोन म्हणी वापरल्याचे दिसून येते.
समारोप:
गझलांमध्ये म्हणी व वाक्प्रचार यांचा वापर केल्याने अभिव्यक्ती अधिक चांगली होते व शेर उठावदार व प्रभावी होतात हे आपणास वरील विवेचनावरून आढळून आले.
(टीप:स्त्रीगझलकारांचे म्हणी व वाक्प्रचारांचा वापर असलेले आणखी काही प्रकाशित अप्रकाशित शेर असू शकतील परंतु विस्तार भयास्तव मी काही निवडक शेरच इथे प्रस्तुत केलेले आहेत.)
....................................................
