Showing posts with label प्रभा सोनवणे. Show all posts
Showing posts with label प्रभा सोनवणे. Show all posts

तीन गझला : प्रभा सोनवणे

 



१.  


कोडे मला छळतेय जे उकलून जा केव्हातरी 

आता तरी ते तंत्र तू शिकवून  जा केव्हातरी


भेटी तुझ्या माझ्या जरी झाल्याच नाही सारख्या 

आषाढमेघासारखा बरसून जा केव्हातरी 


आजन्म सोसावे कसे वैराग्य योग्यासारखे 

आहेस तू प्रेमात हे  सांगून जा केव्हातरी 


कोणी तरी असतोच ना हृदयात राजा आपला

साम्राज्य आता या इथे स्थापून जा केव्हातरी 


कित्येकदा येतीलही माझ्या मनी ती वादळे 

होऊन झंझावात, ती शमवून जा केव्हातरी 


२.


का उगा करतोस कांगावा

तू पुन्हा तो शब्द पाळावा


आरसा दावे अता भीती

जाणिवांचा हा असे कावा


सोहळा तारुण्य ढळल्याचा

साजरा करता तुला यावा


फारशी नसतेच मी येथे

तेथला येईल सांगावा


लादते आयुष्य पाठीवर

का कुणी शेर्पाच नेमावा ?


तारका नांदोत आकाशी

जन्म हा धुलिकणच रे व्हावा


३.


सोसला  दुष्काळ हा, आता तरी,

पावसाच्या बरसु दे झरझर सरी


जातिधर्माचे कशाला दाखले

वाढते आहे विषमतेची दरी


तू किती नाकारल्या काळ्या मुली

भांडते रात्रंदिनी गोरी परी


कष्ट करणे टाळले वरचेवरी

देत आहे कोण भाजी भाकरी ?


ना इथे ना राहते आहे तिथे

भेटला मज विश्वव्यापी तो हरी

..............................................