Showing posts with label दिवाकर चौकेकर. Show all posts
Showing posts with label दिवाकर चौकेकर. Show all posts

तीन गझला : दिवाकर चौकेकर

 



१.


फक्त एक मी खोडी केली, चुकले बहुधा 

छिद्र पाडुनी होडी केली,  चुकले बहुधा 


अक्षर गिचमिड वाचू कैसे  मला कळेना 

मराठीस मग मोडी केली, चुकले बहुधा 


ओझे कैसे वाहुन न्यावे  प्रश्नच होता

उंच देखणी घोडी  केली,चुकले बहुधा 


पेपरमधले कोडे चुकले  सोडवताना 

शेकडोत मग कोडी केली, चुकले बहुधा 


हयातभर जे हसत राहिले माझ्यावरती 

थट्टा त्यांची थोडी केली, चुकले बहुधा 


विरहामध्ये दोन पाखरे  पार बुडाली 

ठरवुन त्यांची जोडी केली, चुकले बहुधा 


रग अंगाची जिरवायाची  हौसच त्यांना 

म्हणून माराझोडी  केली, चुकले बहुधा 


झणझणीत भाजी खाण्याची इच्छा झाली 

थोडी लाडी-गोडी  केली, चुकले बहुधा 


निष्ठा-बिष्ठा  उरले  केवळ  शब्दच आता 

त्यांनी फोडा-फोडी केली, चुकले बहुधा 


गझल लिहाया बसलो काही सुचले नाही 

शब्दांची  गाठोडी  केली, चुकले  बहुधा


परीक्षेतले  उत्तर  माझे  चुकले  होते 

म्हणून खाडा-खोडी केली, चुकले बहुधा


२.


जन्मच अपुला झाला आहे सरणावरती जळण्यासाठी, 

घालवतो पण जीवन वाया, फक्त एवढे कळण्यासाठी 


रोज सकाळी सूर्य उगवतो नित्यनेम हा कधी न चुकतो, 

वाटचाल दिवसाची करतो सायंकाळी ढळण्यासाठी


वसंत येता जादू होते पान-फुलांनी झाड बहरते, 

पान-पान पण, तयार असते शिशिरामध्ये गळण्यासाठी


तहान अपुली भागत असते पिऊन माठामधले पाणी, 

कुंभाराचे कष्ट किती बघ,त्या मातीला मळण्यासाठी 


आळस जर का केला नसता, हरला नसता ससा कधीही,

ऊठ ' दिवाकर ', तयार हो तू स्पर्धेमध्ये पळण्यासाठी


३.


रोज सकाळी गल्लोगल्ली बेल घालणे मला न जमते 

त्याने मजला अन् मी त्याला मोठा करणे मला न जमते


कसे रहावे कसे जगावे आवड असते ज्याची त्याची 

जगा कसेही पण कोणाच्या मुठीत असणे मला न जमते 


कधी कधी तर तहान माझी थेंबावरही भागत असते 

जळ, इतरांच्या ओंजळीतुनी प्राशन करणे मला न जमते 


कधी कुणाला विरोध नव्हता कधी कुणाशी भांडण नव्हते 

पुढे लोक जे जात तयांचे पाय खेचणे मला न जमते


कुभांड रचले डाव साधले छक्के-पंजे केले त्यांनी

रे रे करणे हात टेकणे बोट पकडणे मला न जमते


अनेकदा मग अपयश आले दु:ख डोंगराइतके झाले 

घेण्यासाठी माझी बाजू कुणा भेटणे मला न जमते 


लिहून केवळ चारच ओळी म्हणू लागले कवी स्वत:ला 

केवळ अर्ध्या हळकुंडाने पिवळे दिसणे मला न जमते 

....................................................