१.
अंतरंगातील गर्दी लागली बोलायला
कालचा एकांत आला आजही भेटायला
बिकट किंवा सहजसोपी वाट असते आपली
पण स्वतःच्या भरवशावर लागते चालायला
पापण्यांवर बांधले हे दोन थेंबांचे तळे
तेवढे पुरते तुला माझ्यामध्ये बुडवायला
काळ आहे धावपट्टी लागला आखायला
अन् तुझे शिकणे सुरू आत्ता कुठे रांगायला!
एवढ्यासाठीच दुःखे घेत नाही मी जवळ
लागते त्यांना पुन्हा मी आपली वाटायला
पंख फुटले त्याबरोबर उगवली शिंगे पहा
केवढा माणूस विद्रुप लागला भासायला
आजवर कळलाच नाही या जगाचा चेहरा
आपलासा भासल्यावर लागतो बदलायला
२.
आदिम काळाला आवडली गोष्ट तुझी माझी
युगेयुगे मग त्याने लिहिली गोष्ट तुझी माझी
चित्रे,शिल्पे,लेणी,गुंफा निरखत गेल्यावर
शब्दाविणही सुंदर दिसली गोष्ट तुझी माझी
जरा निराळे ,जगावेगळे नाते लिहिताना
डोळ्यामधुनी अखंड झरली गोष्ट तुझी माझी
आयुष्यावर गार सावली ज्याने धरलेली
त्या झाडाच्या मुळात लपली गोष्ट तुझी माझी
प्रत्येकाला कशी स्वतःची वाटत आहे ती
प्रत्येकाच्या मनात रमली गोष्ट तुझी माझी
भिरभिरणाऱ्या वयात नकळत उमलत गेलेली
डायरीतल्या फुलात सुकली गोष्ट तुझी माझी
यावेळीही भान हरवले कुठे विधात्याचे
याही वेळी अर्धी उरली गोष्ट तुझी माझी
गाभाऱ्याच्या मंदप्रकाशी अखंड दरवळते
चाफ्याने जी उरात जपली गोष्ट तुझी माझी
३.
माहित नाही तो कोणाला फॉलो करतो हल्ली
जगणे सोडुन जगण्यावरती बोलत बसतो हल्ली
आभासी दुनियेचा त्याला कंटाळा आला का?
मुलगा माझा माणसात वरचेवर रमतो हल्ली
कुठून हे एकाकीपण त्याच्यात उगवले आहे?
हरेक नाते खोलखोलवर उकरुन बघतो हल्ली
जगात वावरण्याची त्याला कला साधली म्हणुया
जमेल त्याला जमेल तितके तो वापरतो हल्ली
जन्मभराची दुःखे वेचुन थकलेला म्हातारा
संध्याकाळी त्या दुःखांची गाणी करतो हल्ली
खिडकीमध्ये तुला पाहुनी सळसळते जी फांदी
माझ्यामधला पक्षी त्यावर घरटे विणतो हल्ली
तुझ्यासारखी दिसू लागले आहे मी दुनियेला
तुझा एवढा माझ्यामध्ये वावर असतो हल्ली
....................................................
