Showing posts with label सतीश देशमुख. Show all posts
Showing posts with label सतीश देशमुख. Show all posts

तीन गझला : सतीश देशमुख

 




१.

गाडू शकले नाही अथवा जाळू शकले नाही
मला नेमके कोणीही हाताळू शकले नाही

चार दिसांच्या सुतकाचे तू काय सांगतो मित्रा
माझ्याइतके दुःख कुणी सांभाळू शकले नाही

श्रीमंती पाहून मारली मिठी लोकनेत्यांनी
म्हणजे तुम्ही गरीबाला कवटाळू शकले नाही

तारुण्य मनाचे नैराश्याने हिमनग झालेले
वाफाळू शकले नाही फेसाळू शकले नाही

मी त्यांच्या कपड्यावर इस्त्री सन्मानाने करतो
ज्यांचे वस्त्र कधी घामाने वाळू शकले नाही

ओलाव्याने रोपे सगळी जळून जातिल आता
शेत तुझे जर उन्हामधे भेगाळू शकले नाही

ज्या गावाने विरोध केला सतिश तुझ्या नावाचा
ते गाव तुझी गझल कधी फेटाळू शकले नाही

२.

आजवर कोणत्या सावल्या लागल्या
जिंदगीला उन्हाच्या झळा लागल्या

चाललो भार घेवून खांद्यावरी
पालखीला म्हणे ठोकरा लागल्या

जीवनाचे जरी चित्र दुःखामधे
चेहऱ्यावर छटा हासऱ्या लागल्या

जिंदगी वाटते केस कोर्टातली
फार श्वासागणिक हाजऱ्या लागल्या

शेवटी आपले एवढे सत्य की
लाकडे लागली, गोवऱ्या लागल्या

३.

खरे की भाकरीपुरती घरी शेती जरी होती
पिढीला आमच्या कोठे सुखाची नोकरी होती

दिसे समता जरी या कागदावर डोंगरा इतकी
तुझ्या माझ्यात मित्रा केवढी मोठी दरी होती

खुलासा दे कधी होतो व्यवस्थेच्या शिरोभागी
तुझी होती तशी गावात माझी पायरी होती

किती शहरातल्या एसीत माझा जीव गुदमरतो
किती आल्हाददायक गावची ती ओसरी होती

विकाया काढली शेती मुलाने विठ्ठला सारी
तुला माहीत आहे तीच माझी पंढरी होती

....................................................

© सतीश देशमुख
शेंबाळपिंप्री ता. पुसद जि. यवतमाळ
मो. नं. ७०३८२६७५७६