१.
खरे सांग नव्हतीच जर चूक माझी
कशी काय झाली फसवणूक माझी
अता शक्य नाही मने सांधणेही
तरी शक्यता एक अंधूक माझी
तहानेस त्याच्या सदा तृप्त केले
कधीही न सांगीतली भूक माझी
पुन्हा हातचा एक जाताच आली
पुन्हा एक बेरीज बिनचूक माझी
तुझ्या एवढा हक्क कोणास होता
तरी तूच केली छळवणूक माझी
जरी खोलवर घाव झाला तरीही
खरी ओळ असणार नाजूक माझी
अता मीच माझ्यात रममाण होते
अता मीच करते करमणूक माझी
२.
जर नदी मीच,मी काठ आहे तुझा
याच काठामुळे थाट आहे तुझा
तू कितीही बदल रोज वाटा तुझ्या
राजरस्ता मला पाठ आहे तुझा
रोज हप्त्यामधे जीव घेतोस तू
व्याजदरही भरमसाठ आहे तुझा
एकदा मान्य कर चूक झाली तुझी
हाच मुद्दा जरा ताठ आहे तुझा
हेच दिसते मला भोवताली अता
शांत मी आणि गोंगाट आहे तुझा
बंधने घातली मी उपायांवरी
आणि पर्याय भन्नाट आहे तुझा
३.
चित्त कुठे थाऱ्यावर माझे
वाऱ्यावर आहे घर माझे
तुला त्रास देईल नेहमी
सलगी माझी,अंतर माझे
मूळ मसूदा मीच तरी पण
तू म्हणजे भाषांतर माझे
ओठांनीच लिहू दे आता
नाव तुझ्या ओठांवर माझे
गळ टाकूनी बसले आहे
जहाज त्याचे,बंदर माझे
वरवर भक्ती कशी करावी
ओठ बोलती हर हर माझे
एक शक्यता सरून गेली
आता सगळे जर तर माझे
...................................................