Showing posts with label ओमप्रकाश ढोरे. Show all posts
Showing posts with label ओमप्रकाश ढोरे. Show all posts

दोन गझला : ओमप्रकाश ढोरे

 


१.


नको देवास शोधू तू, रिते असतात गाभारे

म्हणोनी आपुल्या घरचे खुले असतात देव्हारे


सदोदित चालली आहे निसर्गाची पहा शाळा

कधी तुज प्रश्न पडला का कसे फिरतात हे तारे?


विदर्भाचा उन्हाळा हा जगाला सांगतो आहे

उद्याच्या सावलीसाठी मुलांनो झाड लावा रे


हवेला बांधण्याचा या कशाला यत्न करतो तू

उभा मग राहशिल कैसा कुणाच्या सांग आधारे?


जराशा अट्टहासाने किती विपरीत घडलेले

इथे उध्वस्त झालेली हजारो पाहिली दारे


२.


घर मनात वसले असता एवढे पुरे आहे

मी कशास देऊ पत्ता? एवढे पुरे आहे


मी प्रसिद्ध होण्याची ना ठेवली कधी इच्छा

बस तुम्ही मला ओळखता एवढे पुरे आहे


या जगात कोणालाही,वेळ बोलण्या नाही

तुम्हि, बसा घडीभर म्हणता,एवढे पुरे आहे


मी मनातले या अजुनी बोललो कुणाशी ना

जा, नका म्हणू आवडता,एवढे पुरे आहे


येथला विजय हा पक्का,मी कधीच केलेला

सोबतीस असते जनता,एवढे पुरे आहे


...................................................

ओमप्रकाश ढोरे

स्वेदबिंदू, शिक्षक कॉलनी

चांदूर बाजार

जि.अमरावती