१.
कागदाला भार झाले, शेर वरवर फार झाले
जेवढे आतून आले तेवढे अलवार झाले
राखले अस्तित्व तोवर मी फुलांचे हार झाले
टाकले शस्त्रास्त्र खाली तर भुईला भार झाल
जोडल्या रेषा खुबीने वेगळे आकार झाले
चित्र सुंदर जीवनाचे त्यातुनी साकार झाले
मायपण सांभाळताना कैक हळवे घाव झाले
दूर गेले लेकरू अन् मी मनाने घार झाले
रोप इवले लावले पण वाढ दिसली खुंटलेली
काढल्यावर तण विषारी,रान हिरवेगार झाले
२.
विस्तवाच्या वेदनेला सोसणारी चूल तू
घे मनाचा कौल थोडा, दे मनाला भूल तू
शेणमाती झेलणारी क्रांतिज्योती नार तू
आत दु:खे लपवुनी वर सांत्वनाची झूल तू
सिद्ध झाली क्रांतिकारी बघ जिजाऊ माय तू
कैकदा झालीस वाघिण घडविताना मूल तू
बांधलेली नाळ स्त्रीची यातनांनी आजही
टाकली जर कात आता लांघ मोठा पूल तू
वादळाशी झुंजताना बन करारी ढाल तू
बोचणाऱ्या बाभळीवर हो गुलाबी फूल तू
३.
भरून येते दाट केवढे अंबर
आवंढा पण गिळून बसते नंतर
दुनियेसाठी कसून असते कंबर
नको वाटते अंतरातले संगर
दोघांची जर जुळली नाडी होती
पडले का मग लग्नानंतर अंतर
मनात जेव्हा वसतो आहे ईश्वर
हवे कशाला उगाच जंतर-मंतर
उभे ठाकले आयुष्याचे घरकुल
अनेक आले मार्गावरती खंगर
रोपांनी तर छान बाळसे धरले
नियतीने वर पुन्हा फिरवला नांगर
विरहामध्ये कळून चुकले आहे
तनामनाचे धागे जुळले शंभर
..................................................
सौ. दीपाली सुशांत,
कारंजा (लाड),
जि.वाशिम ,
7774854814
