१.
मी कुणाचा भाट नाही, मी कुणाचा दास नाही!
जाणतो ते बोलतो मी, व्यर्थ ही बकवास नाही!
नेक माझा मार्ग हा अन् हाच मग माझा शिरस्ता
मात्र पण केला कुणाचा, मी कधी दुःश्वास नाही!
अंधश्रद्धा, अंधभक्ती, आंधळेपण भोवताली
ठेवतो पण मी कधीही, आंधळा विश्वास नाही!
सत्य, शिव अन् सुंदराचा, मार्ग हा सर्वोत्तमाचा
जाणले मी वास्तवाला, कोणता हा भास नाही!
जन्म ऐसा माणसाचा, फक्त मिळतो एकदाचा
जाण याची ठेव वेड्या, घ्यायचा रे फास नाही!
२.
एवढ्यासाठीच होता घेतला का ध्यास बापू ?
स्वप्न होते थोर तुमचे, फार झाला ऱ्हास बापू !
ते विसरले त्याग तुमचा आणि तुमचे प्रेम सुद्धा
बेइमानांचीच सारी वाढली पैदास बापू !
हिंस्र सारी श्वापदे ही; ना तयांना प्रेम, माया
आज तुमची न्यूनता ही, भासते आम्हास बापू!
थोर त्या कार्यास तुमच्या , मूठमाती द्यावयाला
विकृतांची फौज मोठी, पोसते खोट्यास बापू!
वारसाही थोर तुमचा ते निघाले हो पुसाया
उच्च तुमची नीतिमूल्ये गाडली सर्रास बापू!
शिस्त तुमची लावलेली आज आहे लोपलेली
फक्त सत्ता आणि पैसा , केवढा हव्यास बापू!
काळजी केली न आपण, ना स्वतःची, ना घराची
वाहिले आयुष्य सारे,व्यर्थ का देशास बापू ?
सत्य, शांती अन् अहिंसा, तत्वपालन सक्त केले
घातला आदर्श अनुपम, अखिल या जगतास बापू!
अन्नदाता रोज मरतो, त्यास वाली ना कुणीही
आठवण तुमचीच येते, खंत ना कोणास बापू!
मारला त्यांनी 'अहिंसेचा पुजारी 'एकदा पण
आज ते सर्रास गोळ्या घालिती तत्वास बापू!
तो ' चला खेड्यांकडे ' संदेश तुमचा नेक होता
आज खेडे घेत आहे, शेवटाचा श्वास बापू!
फाटले आभाळ सारे मातला हैदोस येथे
या पुन्हा! या सावराया, वाचवा देशास बापू!
३.
मी सुकृताशी मग जसा मैत्री कराया लागलो
झडल्या सुखाच्या नौबती,अन् मी घडाया लागलो
वाटेत माझ्या मग जरी काटे कुणीही पेरले
पण अमृताचा घास मी त्यांना भराया लागलो
जाणून होतो पण तरी मी बोललो नाही कधी
मी बोललो नाही जरी त्यांना नडाया लागलो
त्यांचाच गलका तो पहा, कानी कपाळी आजही
आक्रोश खोटा ऐकुनी मी तर हसाया लागलो
भासे अभागी सत्य पण, पण तेच तरते शेवटी
हे खूप सारे जाणिले अन् मी तराया लागलो
सत्यास पुजले मी तरी दुष्टास ते लागे कडू
मार्गात मी त्यांच्या जणू काटा बनाया लागलो
बुडत्यास वाचविण्यास मी धाऊन गेलो नेहमी
आला कुणीही आडवा मी मग भिडाया लागलो
त्यांनीच केल्या मसलती, खोट्यास सारे बळ दिले
त्यांच्याच कर्तृत्वामुळे मी मग लढाया लागलो
...................................................
तु.सी.ढिकले
7588828834
