१.
पाताळयंत्री चालला व्यवहार का आहे?
सूर्या तुझ्या नगरीमधे अंधार का आहे?
केसात बकुळीची फुले डोळ्यात सन्नाटा
शापीत असल्यासारखा शृंगार का आहे
तरले पतंगासारखी आधी पुन्हा तुटले
वाऱ्या, तुझा मी घेतला आधार का आहे?
संतापला आहेस की खंतावला नक्की
काळा, तुझ्या डोळ्यांमधे अंगार का आहे?
जमले जुने शायर पुन्हा जळले दिवे शाही
गझले, तुझा सुनसानसा दरबार का आहे?
देवाजवळ आहेस की मुजरा सुरू आहे
भरला फुलांनी एवढा बाजार का आहे?
मी चंद्र, तू माझी 'दिशा'आकाश घर आहे
पोकळ असा मग आपला संसार का आहे?
२.
बदलून जात माझी माकड कशी बनू?
काळानुसार तुमची आवड कशी बनू?
घोषीत जन्मदात्री केले तुम्ही मला
विसरून वय पुन्हा मी अल्लड कशी बनू?
होताच लोकप्रिय मी खंतावलाय तो
छी थू कराल इतकी रद्दड कशी बनू?
माझ्यामधे चिकट जर नाहीत लक्षणे
कार्यास शोभणारी बेगड कशी बनू?
मी भूक मारते पण मापात राहते
प्रियकर गुलाब म्हणतो ! बोजड कशी बनू?
धरतीलगत धुक्याची चादर कशी बनू?
झाली हवा विरळ तर मी जड कशी बनू?
माझ्याजवळ तिच्यागत नाही निळा झगा
दिसते 'दिशा' तशी मी फक्कड कशी बनू?
३.
भिंतीपल्याड नसतो परिसर कसे म्हणू
परसातल्या फुलाला बेघर कसे म्हणू?
झुलते अधांतरी ते छप्पर कसे म्हणू
नाही जमीन त्याला अंबर कसे म्हणू?
पडणे, पडून उठणे, आयुष्य हेच जर
जातोय तोल, त्याला सावर कसे म्हणू?
माझ्या भलेपणावर बोलाल का तुम्ही?
मी रोजच्या टिकेला सुंदर कसे म्हणू?
शतदा तुझा पचवला आहे नकार मी
दगडा तुला फुटू दे पाझर कसे म्हणू?
मोजून साधकाला देतात तीर्थ ते
द्यावी भरून माझी घागर कसे म्हणू?
सूर्यास अर्घ्य देते सर्वांसमोर ती
माझी 'दिशा' तिला मी रितसर कसे म्हणू?
..................................................
