१.
कवी कुठेही जाऊ शकतो
हात नभाला लावू शकतो
काटे लपवत ओठांमध्ये
गीत फुलांचे गाऊ शकतो
नजर फिरवुनी क्षणात एका
दुनियेलाही पाहू शकतो
बर्फाहुनही शीत बनोनी
ज्वालेनेही न्हाऊ शकतो
उतरण सोडत चढत दिशेने
उलट प्रवाही वाहू शकतो
चालायाला वाऱ्याचे पथ
पाण्यावरही धावू शकतो
आकाशाशी करून मैत्री
क्षितिजावरही राहू शकतो
२.
मुलगा-मुलगी भेदाचा लय होवो
समानतेचा त्रिखंडात जय होवो
भेटायाला फक्त एकदा ये तू
नंतर माझ्या जगाचा प्रलय होवो
निर्भयतेने भरली जावी छाती
कणाकणाचे नाहीसे भय होवो
मक्तेदारी पुरुषांची संपावी
सशक्त महिला युगाचा उदय होवो
तुझ्या गुणांच्या सहवासाने गझले
माझ्यामधल्या दोषांचा क्षय होवो
न्यायासाठी घडू न द्यावी हिंसा
अन्यायाचा विरोध सविनय होवो
सुख नांदावे सखये तुझिया दारी
आयुष्याची माझ्या हयगय होवो
३.
फुलात नाही काट्यांमध्ये असते बाई
नव्हे सुखाला तर दु:खाला कळते बाई
कूस रिकामी नवराही असताना दोषी
वांझपणाच्या चितेत केवळ जळते बाई
इच्छांचा झालेला असताना पाचोळा
कुटुंब हिरवे ठेवायाला रुजते बाई
घेत असावा विश्रांती तो वारा सुद्धा
सावलीसही क्षणभर थांबत नसते बाई
संस्कारांची उकरत जातो जेव्हा माती
खोलखोलवर हरेक मुळांत दिसते बाई
हिरवळ नाही, वाळवंट वाट्याला येते
स्विकारते अन् रोज उन्हाशी लढते बाई
पदर खोचुनी अन्यायाच्या विरुद्ध उठते
वेळ प्रसंगी विजही हाती धरते बाई
....................................................
