Showing posts with label नरेन्द्र पाटील. Show all posts
Showing posts with label नरेन्द्र पाटील. Show all posts

तीन गझला : नरेन्द्र पाटील

 



१.

सिंचनावीण त्याचा मळा राहिला
कोरडा भावनांचा गळा राहिला

वेल कळलीच नाही कधी वाढली
बाप माझ्यातला आंधळा राहिला

प्रश्न सुटल्यापरी वाटले पण तरी
एक गोंधळ इथे सावळा राहिला

पांगली माणसे तो बघत राहिला
फक्त पिंडापुढे कावळा राहिला

काय देशील तू सांग त्याला मुला
हात ज्याचा सदा मोकळा राहिला

त्यास जमला कुठे खेळ, कावा, कपट
वेगळा तो जगावेगळा राहिला

एक फडफड जरी शांत झाली तरी
शेष मागे पुन्हा सापळा राहिला

भेट होणार नक्की सखे आपली
आज रस्ता जरी वेगळा राहिला

२.

शरिरामध्ये जिथे जिथे हा श्वास राहतो
चैतन्याचा वास तिथे हमखास राहतो

एके दिवशी सुटेल ही देहाची खोली
मीही येथे भाड्याने तूर्तास राहतो

ती शरीराने दूर कितीही असेल माझ्या
हृदयामध्ये तिचा नेहमी वास राहतो

तिलाही अता कळते या देहाची बोली
काय हवे अन् काय नको अदमास राहतो

गैरसमज अन् संशय करतो घात नेहमी
नात्याची आधारशिला विश्वास राहतो

३.

असा श्वास घे ज्यात मावेल विठ्ठल
तुझ्या रोमरोमी निनादेल विठ्ठल

'जनी' सारखा हक्क गाजव जरासा
तुझ्या सोबती रोज राबेल विठ्ठल

जसा फेर धरशील दिंडीत तूही
तुझ्या पावलांनीच नाचेल विठ्ठल

नको आणखी शोध घेऊ कुठे तू
तुला अंतरातून भेटेल विठ्ठल

मिळाले बहू आणखी काय मागू
अता विठ्ठलालाच मागेल विठ्ठल

..................................................
नरेंद्र पाटील, धुळे
८६६८९३२४४६