१.
उच्छाद मांडलेला वाचाळ कावळ्यांनी
लाथाडले अखेरी, घंगाळ कावळ्यांनी !
लक्षात हे असू द्या कोणीच सिंह नाही
लावून घेतलेली आयाळ कावळ्यांनी !
चिमणी पिले बिचारी उडण्या प्रयास करती
केले परंतु त्यांना घायाळ कावळ्यांनी
''हे कोकिळे, तुला तर गाणे मुळी न येते '',
जाहीर घेतलेला, हा आळ कावळ्यांनी!
असुनी स्वतःच काळे करती खुशाल चाळे,
'अविनाश' ला ठरवले वंगाळ कावळ्यांनी!
२.
गेले हवेत आहे त्यांचे विमान आता !
नाही कुणीच येथे त्यांच्यासमान आता !
केली धमाल खेळी त्यांनी इथे अशी की
शत्रूच स्वागताला,लावी कमान आता !
ऐकून खूप झाली ती कावकाव त्यांची
येता गरूड येथे, बसले गुमान आता
ते बाळसे खरे की नुसतीच सूज आहे ?
भलतीच तंग झाली त्यांची तुमान आता !
म्हणती खुशाल ते की आम्ही खरे इमानी
'अविनाश' ला कळाले त्यांचे इमान आता !
३.
सारे विचार त्यांचे डोक्यावरून गेले!
गपगार होत तेही,डोके धरून गेले !
"आम्ही करूच सेवा,आम्हां नकोच मेवा,"
हे बोल बोलणारे,झोळ्या भरून गेले!
ते दाखवीत आले गाजर अम्हां सुखाचे
आशेवरीच अमुचे जीवन सरून गेले
ते थोर लोक सारे शिरजोर खूप झाले,
नाहक कुणाकुणाला जखमी करून गेले!
होती जिवंत ज्यांची संवेदना खरोखर
बदनाम तेच होता पुरते मरून गेले!
गझलेस आज माझ्या मोठे तुम्हीच केले
नाते युगायुगाचे हे तर ठरून गेले!
हे दु:ख भोगताना, शब्दांत मांडताना
'अविनाश' रे , तुझे हे डोळे झरून गेले!
.................................
डॉ.अविनाश सांगोलेकर,
डी-२०२, विंडसर रेसिडेन्सी, बालेवाडी फाटा, बाणेर, पुणे - ४११०६९
भ्र.९८ ५० ६१ ३६ ०२