Showing posts with label अशोक वानखेडे. Show all posts
Showing posts with label अशोक वानखेडे. Show all posts

दोन गझला : अशोक वानखेडे

 



१.

तुला वाचले अन्, घडू लागलो
तुला वाचल्यावर, लढू लागलो

दिशा कोणती, अन् कुठे जायचे?
तुझे बोट दिसले, उडू लागलो

न हल्ला, न हमला, चढाई कुठे?
पुरे लेखणी बस, लिहू लागलो

असो देव धर्मात कोडे किती!
तुला वाचता, उलगडू लागलो

खऱ्याचीच का हार व्हावी सदा
चलाखीस त्या आकळू लागलो

नसे लायकी, पण बसू दे मला
तुझ्या पायरीवर, चढू लागलो

घडावा नव्या माणसासारखा
तसा मी मला, सापडू लागलो

२.

ओघळू दे आसवांना, संथ ओल्या काजळावर
हात दे हातात माझ्या, जिंदगी आणू रुळावर

घाव मौनाच्याच आता, नेमका देऊ मुळावर
बोल तू बिंधास मित्रा, अंतरीच्या मोहळावर

जाणतो आहेस तू की, दोष अंधारात आहे
पेट घे रे अत्त दीपा, तू तुझ्या आता बळावर

देत हाका माणसाला, आजही तो बोलावतो
एक ना माणूस आला, ख्रिस्त मग जातो सुळावर

गोड आहे साखरेसम, ती मधाच्या सारखी पण
लागल्या माशाच केवळ, लोकशाहीच्या गुळावर

माणसाने माणसाला, मानले माणूस केव्हा?
जीव देतो, जीव घेतो मस्जिदी अन देवळावर

लाभले लावण्यलेणे, कोरल्या नक्षी कपारी
कोण गेला जीव कोरून, घोर काळ्या कातळावर

.................................
अशोक वानखडे,
कल्याण
9619413193