Showing posts with label 'अविनाशपासष्टी' गझलसंग्रह : एक शोध : दिवाकर चौकेकर. Show all posts
Showing posts with label 'अविनाशपासष्टी' गझलसंग्रह : एक शोध : दिवाकर चौकेकर. Show all posts

'अविनाशपासष्टी' गझलसंग्रह : एक शोध : दिवाकर चौकेकर




आद्य मराठी गझलसंशोधक आणि ज्येष्ठ मराठी गझलकार डाॅ.अविनाश सांगोलेकर आपल्या वयाच्या पासष्टीत पदार्पण करत असताना आपल्या निवडक ६५ गझलांचा समावेश असलेला, आयुष्यातील पहिला गझल संग्रह प्रकाशित करतात काय, या संग्रहावर दुसरा एक गझलवर प्रेम करणारा, गझलचा अभ्यासक, डॉ. धनंजय भिसे महाविद्यालयीन सेवेचा भाग म्हणून एक लघुशोधप्रकल्य पूर्ण करतात काय, हे सगळं निव्वळ अकल्पित असं वाटत असतानाच त्या लघुशोधप्रकल्पाचे संस्कारित - सुधारित रूप 'अविनाशपासष्टी' गझलसंग्रह : एक शोध नावाचा एक छोटेखानी संशोधननिष्ठ समीक्षाग्रंथ प्रकाशित होतो काय ही मराठी गझलच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलेली घटना असावी आणि म्हणूनच डाॅ. धनंजय उर्फ धनाजी भिसे लिखित या समीक्षाग्रंथाची निवड, मी ह्या पुस्तक परीक्षणाकरिता केली आहे. 


डाॅ धनंजय सोमनाथ भिसे हे एम.ए.(मराठी), बी.एड्., एम.फिल., सेट, नेट, पीएच.डी., डी.सी.एस. असून रयत शिक्षण संस्थेचे एस.एम.जोशी कॉलेज, हडपसर, पुणे येथे मराठी विभागात साहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. 


डाॅ अविनाश सांगोलेकर ह्यांच्याविषयी मला आदर तर आहेच शिवाय त्यांच्या गझलांबद्दल मला आस्था आणि आकर्षण देखील आहे. त्यांचा 'अविनाशपासष्टी' हा गझलसंग्रह त्यांच्या दीर्घकालीन वाङ्मयीन तपस्येची फलश्रुतीच होय आणि त्यांची गझल ही श्रेष्ठ मानवी उदारते बरोबरच वंचितांचे दु:खही समजावून घेते. निर्मळ कलावंताच्या पोटीच उच्च व विशाल कलेचा जन्म होतो असे 'अविनाशपासष्टी' बद्दल आपले मत असल्याचे डाॅ धनंजय भिसे  या समीक्षाग्रंथाच्या मनोगतात व्यक्त करतात. 



'अविनाशपासष्टी' या गझल संग्रहाचेच सुंदर असे निसर्गाच्या सान्निध्यात काढलेले डाॅ अविनाश सांगोलेकर ह्यांचे छायाचित्र असलेले मुखपृष्ठच सुधारित स्वरुपात डाॅ धनंजय भिसे यांनी या समीक्षाग्रंथाचे मुखपृष्ठ म्हणून सादर केले आहे. 


फारसी-उर्दूमधील गझल मराठीत आणणारे माधवराव पटवर्धन उर्फ माधव जुलिअन आणि मराठी गझल चळवळीचे आद्य प्रवर्तक गझलसम्राट दादासाहेब सुरेश भट यांचेबरोबरच मराठी गझलेवर प्रेम करणाऱ्या व मराठी गझलेसाठी काम करणाऱ्या सर्वांनाच हा समीक्षाग्रंथ अर्पण करण्यात आला असून गझलनवाज भीमरावजी पांचाळे यांच्या तसेच मलपृष्ठावर ज्येष्ठ गझलकार श्री प्रदीप निफाडकर यांच्या शुभेच्छा लाभलेल्या आहेत.  


या समीक्षाग्रंथाची मांडणी पाच प्रकरणांमध्ये करण्यात आली असून उपोद्घात हे पहिले प्रकरण आहे. दुसऱ्या प्रकरणात डाॅ. अविनाश सांगोलेकर : व्यक्ती आणि वाङ्मय यावर तर तिस-या प्रकरणात 'अविनाशपासष्टी' गझलसंग्रह : सामाजिक आकलन याबद्दल सविस्तर विवेचन करण्यात आले आहे. 'अविनाशपासष्टी' गझलसंग्रह : वाङ्मयीन आकलन यावर चौथ्या प्रकरणात भाष्य करण्यात आले असून पाचवे प्रकरण या समीक्षाग्रंथाचा उपसंहार करणारे आहे. समीक्षाग्रंथाच्या अखेरीस काही परिशिष्टे दिलेली असून त्यानंतर संदर्भसूची देखील देण्यात आली आहे. 


'अविनाशपासष्टी' गझल संग्रहाबद्दलची आपली निरीक्षणे व निष्कर्ष मांडताना डाॅ धनंजय भिसे लिहितात की, 'गझल' हा फार्सी काव्यप्रकार असून तो अरबी, फार्सी व भारतीय मुस्लिम संस्कृतींच्या संगमातून रंगरूप प्राप्त करत गेलेला प्रकार आहे. मराठी गझल हा काव्यप्रकार पुढे जन्माला आला असून तो भावकविता, भावगीत ह्यांच्या जवळ जाणारा असला तरी गझलेला स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व आहे. गझलेच्या प्राथमिक घटकाला व्दिपदी/शेर म्हणतात. पहिल्या व्दिपदीला मतला असे म्हणतात तर गझलकाराच्या नावाचा उल्लेख ज्या शेवटच्या द्विपदीत असतो अशा द्विपदीला 'मक्ता' असे म्हणतात. गझलेतील एका द्विपदीचा दुसऱ्या द्विपदीशी संबंध नसणे हेच गझलचे वेगळेपण आहे. प्रत्येक द्विपदी ही एक स्वतंत्र कविता असते. यामुळेच गझल ही इतर काव्यप्रकारांहून वेगळी ठरते. 


डाॅ अविनाश सांगोलेकर हे प्रारंभी कवी-गीतकार होते व नंतर ते गझलकार झाले. पुढे १९८२ पासून गझललेखन, गझलसमीक्षा व गझल संशोधनासाठी त्यांना सुरेश भट आणि डाॅ सुरेशचंद्र नाडकर्णी ह्यांचे मार्गदर्शन मिळत गेले. ह्या दोन मान्यवरांच्या सूचनेनुसारच त्यांनी गझल लेखनापेक्षा गझलसमीक्षा व गझलसंशोधन ह्या दोन गोष्टींवर लक्ष केंद्रित केले. त्यातूनच त्यांना गझलकारापेक्षा गझल समीक्षक,गझल संशोधक किंबहुना आद्य मराठी गझलसंशोधक म्हणून ओळख मिळत गेली आणि त्यामुळेच त्यांचा 'अविनाशपासष्टी' हा पहिला गझल संग्रह फार उशिरा म्हणजे जवळपास ४० वर्षांनंतर प्रकाशित झाला. ६५ गझलांचा हा संग्रह त्यांनी आपल्या वयाच्या पासष्टीत पदार्पण केल्यानंतर प्रकाशित केला म्हणून ह्या गझल संग्रहाचे  'अविनाशपासष्टी' हे शीर्षक औचित्यपूर्ण, अर्थपूर्ण आणि समर्पक आहे ह्यात शंका नाही. वयाच्या पासष्टीत व ४० वर्षे उशिरा गझल संग्रह प्रकाशित झाला. कारण डाॅ अविनाश सांगोलेकर आपल्या नोकरीच्या व्यापात इतके अडकले होते की, आपल्या गझलेकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ मिळाला तो आपल्या निवृत्तीनंतरच. अर्थात या काळात त्यांची स्वत:ची ९ स्वतंत्र अशी पुस्तके आणि त्यांनी संपादित केलेली ९ पुस्तके प्रकाशित झाली होती. 


थोडक्यात १९८० ते २०२१ ह्या काळातील ह्या ६५ गझला असून संग्रहातील एकूण द्विपदींची संख्या ३६७ आहे. प्रत्येक गझलेच्या शेवटी 'अविनाश' हा आपला तखल्लुस वापरला आहे. प्रत्येक गझलेच्या तळाशी वृत्त, स्थळ व तिच्या पूर्वप्रसिद्धी विषयीचा तपशील दिला आहे. ६५ गझलांपैकी ५२ गझला मुसलसल तर १३ गझला गैरमुसलसल आहेत. ६५ गझलांपैकी ४२ गझला काफिया-रदीफ युक्त तर २३ गझला गैरमुरद्दफ आहेत. ५७ गझला २० अक्षरगण वृत्तांमध्ये आहेत तर ८ गझला मात्रावृत्तात (म्हणजे जातींमध्ये) आहेत. आशयाच्या दृष्टीने बघावयाचे झाल्यास ३३ गझला सामाजिक-राजकीय आशय व्यक्त करणा-या असून विचारप्रवण आहेत. ३० गझला चिंतन-आत्मचिंतनपर असून भावनाप्रधान आहेत तर २ गझला स्त्रीचे रूपक वापरून सत्ता, संपत्ती, कीर्ती, संधी, आपत्ती, परीक्षा अशा गोष्टी जीवनात आल्यावर होणाऱ्या गमतीजमतींचे विनोदी चित्रण करणाऱ्या आहेत. ६५ पैकी ३ गझला ह्या हझल या उपप्रकारातील आहेत तर एक गझल ही 'तरही गझल' या उपप्रकारातील आहे.


डाॅ अविनाश सांगोलेकर हे १९८० पासून गझल लिहितात तरी गझल संग्रह प्रकाशित करण्याची कुठलीही घाई न करता ४० वर्षांनंतर त्यांनी आपला पहिला गझल संग्रह 'अविनाशपासष्टी' प्रकाशित केला हे सुद्धा या संग्रहाचे एक वेगळेपण आहे असे डाॅ. धनंजय भिसे या समीक्षाग्रंथात नमूद करतात. 


डाॅ.अविनाश सांगोलेकरांच्या गझलेत समकालीन वास्तवाचे दर्शन घडते. समाजातील स्थित्यंतरे व घटना ह्यांचे वास्तववादी चित्रण त्यांच्या गझलेत दिसून येते. त्यांची गझल सामाजिक बदलांची नोंद घेणारी आहे तर काही ठिकाणी वास्तव बदलण्यासाठी, परिवर्तनासाठी ते क्रांतीची भाषा बोलताना दिसतात. त्यांच्या गझलांमधून एक वेगळेच जग वाचकांसमोर येते. एकंदरीत समाजावर होणारा अत्याचार, अन्याय ह्यांना वाचा फोडण्यासाठी ते आपल्या शब्दांचा हत्यार म्हणून वापर करताना दिसतात. 


ह्या संग्रहातील भाषा ही आशयानुकूल असून रोमांच, कंप, गर्जना, निनाद इत्यादी सूर हे प्रसंगानुसार द्विपदींमधून व्यक्त झालेले दिसतात. संग्रहातील काही गझलांची शीर्षके समर्पक वाटतात तर काही खोलवर परिणाम करणारी वाटतात. 


ह्या समीक्षाग्रंथाद्वारे डाॅ अविनाश सांगोलेकर व त्यांचा 'अविनाशपासष्टी' हा गझलसंग्रह ह्यांचा शोध घेतला, त्यासाठी पूर्वग्रहविरहित दृष्टिकोन व तटस्थपणाचा अवलंब केल्याचे समाधान आहे असे डाॅ धनंजय भिसे सांगतात. 


ह्या संग्रहामुळे मराठी गझल क्षेत्रात, मराठी गझल समीक्षा क्षेत्रात, गझल संशोधन क्षेत्रात केवळ संख्यात्मकच नव्हे तर गुणात्मक भर पडेल असा विश्वास देखील डाॅ धनंजय भिसे यांनी आपल्या समारोपात व्यक्त केला आहे. 


'अविनाशपासष्टी' गझलसंग्रह : एक शोध हा संशोधननिष्ठ समीक्षाग्रंथ सादर करताना डाॅ. धनंजय भिसे यांनी जवळपास सर्वच विषय, सर्वच बाबी अगदी शास्त्रोक्त पद्धतीने व सविस्तर हाताळल्या, तपासल्या आहेत असे म्हणावे लागेल. कारण एकाच गझल संग्रहावर एकशे चार पानांचा असा समीक्षाग्रंथ सादर होण्याची निदान माझ्या पाहण्यातली तरी ही पहिलीच वेळ आहे आणि म्हणूनच ह्या गझल संग्रहाचे व ह्या समीक्षाग्रंथाचे हे एक वेगळेपण आहे असे म्हणावेसे वाटते. 


एकंदरीतच, इतका सर्वांगसुंदर, सर्वांगीण आढावा घेणारा एक समीक्षाग्रंथ मराठी गझल क्षेत्राला आणि मराठी गझल अभ्यासकांना उपलब्ध करुन दिल्याबद्दल डाॅ. धनंजय भिसे यांचे मनापासून अभिनंदन करतो पण त्याच वेळी माझ्या मनाला खटकलेली एक गोष्ट इथे मुद्दाम नमूद करतो ती म्हणजे, इतकी मेहनत घेऊन, बारकाईने सगळ्या नोंदी शोधत, त्या तपासून घेत त्यांचा समावेश या समीक्षाग्रंथात अभ्यासपूर्ण रीतीने करुन पूर्णत्व प्राप्त केलेल्या व गझल क्षेत्रात संशोधन करू इच्छिणाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरू शकणाऱ्या या समीक्षाग्रंथाला डाॅ. धनंजय भिसे यांनी स्वत:च 'छोटेखानी' असे संबोधणे निदान मला तरी पटले नाही. असो .


....................................................

'अविनाशपासष्टी' गझलसंग्रह  : एक शोध 

संशोधननिष्ठ समीक्षाग्रंथ : डाॅ धनंजय भिसे 

प्रकाशक : ग्रंथाली, माहीम (प) मुंबई 

मूल्य  :  १२० रुपये 

....................................................