Showing posts with label डॉ.सुभाष कटकदौंड. Show all posts
Showing posts with label डॉ.सुभाष कटकदौंड. Show all posts

तीन गझला : डॉ.सुभाष कटकदौंड

 



१.


फायद्याचे सांगणे बेकार झाले 

बोलणे आता तसे व्यवहार झाले 


ना उघडले दार दोघांनी मनाचे 

पाहिले उध्वस्त मी घरदार झाले 


याद माझ्या सोबती ठेवून गेली 

हे सखीचे केवढे उपकार झाले 


आसवांना जाळले डोळ्यांत त्याने 

दुःखही माझे असे दिलदार झाले 


एकटा मी भांडलो होतो मनाशी 

मित्र आले सोबती... आधार झाले 


२.


घडत गेलोय संस्काराने बाकी काही नाही 

झालो मोठा कर्तृत्वाने बाकी काही नाही 


आयुष्याच्या वाटेवरती सखीच झाली काठी

आलो इथवर आधाराने बाकी काही नाही 


आयुष्याच्या गणिताची मज नव्हती ओळख-पाळख 

खूप शिकवले व्यवहाराने बाकी काही नाही 


काय करावे? कसे करावे? समजत नव्हते काही 

विचार केला रिक्त मनाने बाकी काही नाही 


आठवणींचा पाऊस सखे आला माझ्या दारी

भिजलो मीही आनंदाने बाकी काही नाही


३.


मी व्यर्थ केली चिंता जगाची 

गुंडाळली मग इच्छा मनाची 


का स्वप्न मोठे केले उगा मी

विसरून गेलो ओळख स्वतःची 

 

या आसवांना वाहू दिले मी 

का वाट पाहू ओल्या नभाची


घेतो जराशी माघार मीही 

भाषा सखीची आहे तहाची 


जे आज झाले ते आज झाले 

केली तयारी आता उद्याची 


....................................................

डॉ. सुभाष हरिबा कटकदौंड - खोपोली,रायगड