१.
भावनांचा कोंडमारा सोसते का?
संकटांचा रोज डोंगर पेलते का?
आजही अन्याय होतो
स्री-मनावर
'मी'पणाला माणसाच्या पोसते का?
लेक सावित्री फुले अन् जोतिबाची
'स्त्री'पणाला अंतरी तू कोसते का?
पेटवूनी ज्ञानज्योती जाळ दुःखे,
अंतरीच्या वेदनेला साहते का?
घे भरारी या नभाशी, बघ जगाला
जीवनाला तू अशी कंटाळते का?
वेदना विसरायच्या जिंकायचे जग
वेदना लेऊन पदरी पोळते का?
बाग सुंदर जीवनाची केवढी ही
सावलीचे झाड होण्या टाळते का?
२.
पापण्यांना आसवांचा भार आहे
केवढे आयुष्य हे बेजार आहे
का अशी ही वागते दुनिया कळेना,
टांगती मानेवरी तलवार आहे
बघ जरा तू या जगाच्या वेदनेला
या फुलांवर रोज अत्याचार आहे
पोरकी झाली मुले द्या धीर त्यांना
संपला त्यांचा अता आधार आहे
जन्म घेता सोबतीने 'जात' येते
माणसाला लागला आजार आहे
बोलताना राग, द्वेषा दूर ठेवू
पेटलेला शब्द हा अंगार आहे
कुंपणाने फस्त केले शेत सारे
घातलेला काळजावर वार आहे
३.
खेळ मनाचे किती भयंकर
धावत असते उगा निरंतर
सावरते मी क्षणाक्षणाला,
झेप मनाची कधी दिगंतर
कातरवेळी उरी दाटते,
आठवातली ओढ अनावर
कोण जाणतो हृदयामधले
ओठ हासरे, उरात खंजर
मौनामध्ये रमल्यानंतर
सापडते प्रश्नाचे उत्तर
थांग मनाचा लागत नाही,
जरी घातला मनास आवर
इवलेसे मन अवखळ भारी
नकाच छेडू घडेल संगर
दुःख मानसी सलते जेव्हा
कोण घालतो मनास फुंकर
मनामनांची गुंफण करते
प्रत्येकाचे जगणे सुंदर
.................................
छाया बैसाणे-सोनवणे
जळगाव
9284635108
