१.
जगाने टाळले आहे म्हणुन आले मनापाशी
मनाने टाळल्यावर व्यक्त मी होऊ कुणापाशी?
मला सांगायचे नव्हते तुझ्यामाझ्यात घडलेले
तुझी चुगली करावी लागली पण ईश्वरापाशी
कशी ऐकेल तो माझी विराणी आर्त एखादी
नद्यांच्या संगिताचा ओघ असतो सागरापाशी
प्रखर माझ्याच तेजाने मला तळपायचे आहे
दिले धाडुन परत उसन्या प्रकाशाला नभापाशी
बघुन डोळ्यांतली खळबळ मनाला वाचले त्याने
खरे बोलू किती, लपवू किती मी आरशापाशी?
घराजवळून जाताना अपेक्षा एवढी त्याची
म्हणावे मी जरा तू थांब चंद्रा मोगऱ्यापाशी
सुखाने लावली होती हजेरी रोज त्यानंतर
तरी रेंगाळते मन का निरागस शैशवापाशी?
२.
बंधने लादा तिच्यावर खूप जाचक
आणि मग हल्ले करा रे प्राणघातक
सभ्यता इथली तुला शिकवीन मी पण
धारणा आधी मनाची सोड भ्रामक
वाढला कळपात हरणांच्या जरी तो
पोर कोल्ह्याचा कसा होणार शावक?
का म्हणाला दोष आहे पाखरांचा?
जर स्वतःच्या अडकला जाळ्यात नाहक
हा कसा अभिनय तुला जमतो लफंग्या?
तू जगाला वाटतो आहेस साधक
आत आली आठवांची रांग भरभर
मी उघडल्यावर मनाचे बंद फाटक
कर तुझे काळीज तू इतके सुवाहक
स्नेह होइल त्यातुनी माझा प्रवाहक
३.
तुझ्या अगदी जवळचा मित्र वेड्या, तो असू शकतो
तुझी जागा तुला केव्हातरी जो दाखवू शकतो
जनक उपयुक्त शोधांचा जरी तो आजवर आहे
भडकल्यावर सहज मेंदू उभे जग पेटवू शकतो
नको ताऱ्यांकडे पाहून पृथ्वी तू दिशा ठरवुस
तुझ्या भ्रमणामुळे सुद्धा कधी तो मावळू शकतो
भले घेऊन येतो पावसाला नेहमी वारा
कदाचित एकदा वणव्यास वारा चेतवू शकतो
नितळ कोरे मनाचे लख्ख अंगण सांगते आहे
निराळ्या कल्पनांचा कवडसा आता पडू शकतो
इथे आत्म्यात वसतो अंश देवाचा मनुष्याच्या
तुलाही नास्तिका दरवळ धुपाचा आवडू शकतो
कुणी का घेत आहे आळ डोहावर बुडवल्याचा
तिला शेजारचा तो आड बहुधा संपवू शकतो
....................................................