Showing posts with label दिलीप सीताराम पाटील. Show all posts
Showing posts with label दिलीप सीताराम पाटील. Show all posts

तीन गझला : दिलीप सीताराम पाटील

 




१.

रोजरोजची कटकट सरली नाही
आयुष्याची फरफट सरली नाही

रोज सोसतो मुक्या मनाचे जळणे
हृदयामधली घुसमट सरली नाही

स्वार्थापोटी नको तिथेही झुकते
या दुनियेची सरपट सरली नाही

खड्डे, वळणे, धोक्यांनी भरलेली
वाट अजुनही किचकट सरली नाही

'मी मोठा' ची स्पर्धा भरली आहे
हेव्याचीही चितपट सरली नाही

कशी जुळावी मनामनांची नाती
वर्तन, भाषा कडवट सरली नाही

कसा म्हणू मी सुखात जगतो आहे
अजून आदळ-आपट सरली नाही

२.

माणसाचे वागणे इतके असावे लाघवी
एकदाची संपुनी जावी जगातुन यादवी

ऐल नाही, पैल नाही, देव तो असतो कुठे
शोधण्यातच भक्त सारा जन्म वाया घालवी

नित्य कष्टाने जरी मी सिंचतो तुजला सुखा
वेदनेला का तरी फुटते नव्याने पालवी

एकदा तू भेट अन् नंतर मला काही नको
पूर्ण का होऊ नये इच्छा जरी ही वाजवी

काल परवा केवढा सुंदर दिसे हा देश पण
एवढ्यातच यासही का लागली ही वाळवी

शक्य नाही तोवरी अपुले मिलन येथे सखे
भिंत बनुनी जोवरी ही जात आहे आडवी

३.

हवे तसे अन् नको तिथे वाकवता येते
मनाप्रमाणे दुनियेला वापरता येते

शब्द कधीही नसतो केवळ अर्थापुरता
शब्दांनी विझवतो तसे पेटवता येते

मी स्वप्नांना कधीच दुय्यम मानत नाही
स्वप्नांनी तर जगासही जागवता येते

स्वार्थासाठी सत्तेचे डमरू केल्यावर
जनतेला डोलवता अन् नाचवता येते

सत्याने जर एकीचे रणशिंग फुंकले
खोट्यालाही सहज रणी हारवता येते

कुठे राहिल्या मर्यादा ह्या निळ्या नभाला
मनासारखे हवे तिथे वावरता येते

द्वेषाने तर द्वेष वाढतो आणि दुरावा
प्रेमाने युद्धाची धग थांबवता येते


...................................................
दिलीप सीताराम पाटील
8390893961