१.
जातीयवाद करते उध्वस्त लोकशाही
अन् संविधान करते आश्वस्त लोकशाही
पडते फिकी गरजही पोटातल्या भुकेची
धर्मांधतेत उरते मग ध्वस्त लोकशाही
गर्भातल्या कळीचा आक्रोश ऐकला अन्
रडली मुक्यामुक्याने..नेमस्त लोकशाही
सुख, सत्य, न्याय, समता ठरतात शाप मोठे
इतकी तरी असावी का स्वस्त लोकशाही?
जर का उदात्ततेचे अंगात बीज रुजले
नांदेल मग जगी ही विश्वस्त लोकशाही
२.
प्राक्तनाचा खेळ कळला ना कधीही
जीवनाचा मेळ बसला ना कधीही
भोगला वनवास सीतेने तरीही
संचिताचा भोग टळला ना कधीही
लोपली का नीतिमत्ता? संस्कृतीही
का कुणाला प्रश्न पडला ना कधीही
मात केली अडथळ्यांच्या शर्यतीवर
पण सुखाचा मार्ग दिसला ना कधीही
शेवटी कातळ..इथे झाला मनाचा
भावनांचा प्रश्न सुटला ना कधीही
३.
प्रतिविश्व ब्रह्मांडात ह्या स्थापायचे आहे मला
मोहक अदांना मेनके, टाळायचे आहे मला
माझ्या-तुझ्या मधली दरी लांघायची आहे मला
जर आपले नाते पुन्हा जोडायचे आहे मला
आता मनाची शांतता शोधायची आहे मला
भगवान बुद्धांना शरण मग जायचे आहे मला
दुःखासवे आयुष्य कवटाळायचे आहे मला
हे प्राक्तना ! आता तुला हरवायचे आहे मला
भेदून तिमिराचे वलय उजळायची आहे दिशा
ज्योतीसवे जीवन अता जाळायचे आहे मला
...................................................
सौ ज्योती पाटील,
पुणे
