Showing posts with label यशवंत हिराबाई त्र्यंबक पगारे. Show all posts
Showing posts with label यशवंत हिराबाई त्र्यंबक पगारे. Show all posts

तीन गझला : यशवंत हिराबाई त्र्यंबक पगारे

 



१.

तुला कधी मी म्हटले भुकेस ह्या भाकर दे
जगायला फक्त हवा तसा मला आदर दे

किती तरी गारठली इथेतिथे बघ जनता
असेल जर जास्त घरी कुणास तू चादर दे

तुला सरी लाख मिळो तळे तुझे लाभ तुझा
परंतु लोकांस जरा भरून तू घागर दे

नको किनारा असला जिथे जिथे मी बुडतो
भले हवे तर मग तू उधाणता सागर दे

खरी नदी तू सखये वाहत यावी हृदयी
तहानलो मी इतका तुझ्यातला पाझर दे

घरात बिलगून सदा बसून राहू चल ना
क्षणोक्षणी मात्र तुझी मनातली पाखर दे

भरात माझे मन हे तशी तुही सोबत कर
उडायचे उंच तिथे मला तुझे अंबर दे

२.
             
मीही आता का थांबावे विचार करतो
विश्वासाने माझ्या मागे कुणी चालतो

आज ढगाने हिशेब द्यावा ह्या वाफेचा
दान भुईचे घेतो आणिक किती फसवतो

तलवारीने प्रश्न कुणाचा सुटला नाही
म्हणून मित्रा जमेल तितका बुद्ध सांगतो

आभाळाने करार केला माझ्या सोबत
'तू झाडांना वाढव नंतर धुंद बरसतो'

तिने काढले त्या जन्माचे उट्टे सारे
मी का वेडा आज-कालचे सर्व विसरतो?

पावा नाही तसा खरे पण जर प्रेमाने
कुणी लावले ओठांना तर छान वाजतो

नथ मोत्याची जरी चांगली नको वाटते
तिचा आकडा शृंगाराची वाट रोखतो
          
३.

व्यथा काय सांगू तुला आज सारी
कुठे पाय माझे कुठे ही पथारी

प्रवाहात सजणी जिथे रौद्र धारा
कसा काय थांबू असा मी किनारी

कबीरास दोहा अता आठवेना
कुणी चोरली बघ जुनी एकतारी

तिला भेटण्याचे किती डाव भारी
असे प्रेम माझे,असा मी जुगारी

चला पांडुरंगा, करू बंद वारी
घुसाया नको ना इथे पण पुढारी

खरे बोलण्याची, तडे दावण्याची
कुणी आरशाला दिली का सुपारी?


..................................................
यशवंत हिराबाई त्र्यंबक पगारे
बदलापूर
९८९२३३३६८३