हमन है इश्क मसताना, हमन को होशियारी क्या;
रहे आजाद या जग से, हमन दुनिया से यारी क्या?
जो बिछुडे है पियारे से, भटकते दरबदर फिरते;
हमारा यार है हम मे, हमन को इंतिजारी क्या?
खलक सब नाम अपने को, बहुत कर सिर पटकता है;
हमन गुरुनाम सांचा है, हमन दुनिया से यारी क्या?
(हमन गुरुज्ञान आलिम है, हमन को नामदारी क्या?)
न पल बिछुडे पिया हम से, न हम बिछुडे पियारेसे;
उन्हीसे नेह लागी है, हमन को बेकरारी क्या?
(हो ऐसी लव लगी हरदम, हमन को बेकरारी क्या?)
कबीरा इश्क का माता, दुई को दूर कर दिलसे;
ये चलना राह नाजुक है, हमन शिर बोझ भारी क्या?
गझलकार आहेत संत कबीर. गझलेच्या शेवटच्या शेरात त्यांची नाममुद्रा ठसठशीतपणे उमटलेली आहे. (इश्क = प्रेम, खलक = लोकसमूह, जगत, आलिम= जाणणारा, जाणकार, नामदारी- प्रसिद्धी, लव- लौ, धुन, लगन, दुई - दुही, द्वैत आणि बेकरारी म्हणजे बेचैनी.) बहर-ए-हजज मुसम्मन सालिम ह्या अक्षरगण वृत्तामधे आढळून येणारी ही कबीरांची एक सुप्रसिद्ध हिन्दुस्तानी गझल. रुक्न आहे 'मुफाईलुन.' मराठीत वृत्तनाम 'वियद् गंगा.' अक्षरगण आहे 'यमाता गा/ य गण + गा, चार वेळा. अर्थात् 'ल गा गा गा' चतुर्गणी. भाषा आहे हिन्दवी खडी बोली हिन्दुस्तानी-हिन्दी.
इसवी सनाच्या चौदाव्या शतकात अमीर खुस्त्रोंची फारसी उर्दू गझल आढळते. पुढे फारसी उर्दू गझलेचा भाषिक प्रवास हिन्दवी-हिन्दुस्तानी - खडी बोली हिन्दी - हिन्दी असा
अधिकाधिक विस्तारत जातो. उन्नत होत जातो. पंधराव्या शतकात सर्वप्रथम आढळून येते ती कबीरांची हिन्दुस्तानी गझल. या कालखंडात हिन्दी गझलेची घट्ट रोवली गेलेली पाळेमुळे कबीरांच्या रचनांद्वारे अधिक फोफावत गेली. म्हणूनच कबीरांना आद्य हिन्दी गझलकार म्हणता येईल; मानता येईल.
संत कबीर. एक मध्ययुगीन प्रसिद्ध संतकवी आणि हिन्दी साहित्यकार. इ. स.१३९९ ते इ. स. १५१९ असा कबीरांचा १२० वर्षांचा एकूण आयुष्यकाळ. (कबीरपंथी परंपरे अनुसार.)
कबीर आठवले की डोळ्यांसमोर येतात त्यांचे दोहे, सांखिया आणि उलटबांसीया. कबीरांनी अनेक पदे लिहिलीत. भजने रचलीत. त्यामध्ये अनेक पदांची वृत्ते ही गझलवृत्ते असल्याचे बारकाईने वाचणाऱ्यास आणि मुखाने गुणगुणणाऱ्यास जाणवेल. "हमन है इश्क...." ही कबीरांची एक सुप्रसिद्ध आणि नितांत सुंदर गझल. संत कबीर हे निर्गुण ज्ञानधारेचे पाईक. अध्यात्मबाजारात बोकाळलेल्या पाखंडाचे अगदी सहज, स्पष्ट, परखडपणे खंडण करणारे. ते म्हणतात आम्हास आत्मज्ञान, आत्मभावस्थिती प्राप्त झालेली असून त्या आत्मप्रेमाच्या स्थितीमध्ये आम्ही प्रेममय, मस्त झालेलो आहोत. आम्ही मस्त आहोत. मस्तभावात जगतो. आम्हाला सांसारिक लांड्यालबाड्या, चतुराई करण्याचे प्रयोजन काय? आत्मलीन साधक दुनियेच्या चतुरतेत अडकून पडत नसतो. मस्तस्थितीमध्ये आम्ही संसारजगतापासून स्वतंत्र आहोत. दुनियादारीचा मोह नाही. कोणतीही बंधने नाहीत. कोण्याही वस्तू वा व्यक्तीसोबत प्रेम जोडून आम्हास काय उपयोग?
'जो बिछुडे है पियारे से, भटकते दर-बदर फिरते
हमारा यार है हममे, हमन को इन्तजारी क्या?'
पियारा अर्थात प्यारा. लोकभाषेतील अंगभूत सौंदर्य घेऊन जन्मास येणारे हे 'प्यारा' शब्दाचे मूळरुप. मूळरुपातील शब्दांची मोहिनी बोलीभाषेत पिढ्या न् पिढ्या टिकून राहते. जे आपल्या परमप्रियापासून, परमात्म्यापासून दुरावलेले आहेत ते नेहमी दर-बदर-दारोदार भटकत असतात. परंतु आम्हास पक्का बोध आहे की, आमचा प्रियतम, आमचा परमात्मा तर आमच्याठायीच विराजमान आहे. त्यास बाहेर जनी-वनी-तीर्थी शोधण्याचे भ्रमात आम्ही पडू शकत नाही. मी आणि माझा परमात्मा वेगळे-वेगळे नाहीत. मी न्यारा आणि माझा परमात्मा न्यारा असे द्वैत नाही. आमच्यात दुई नाही. दुही नाही, द्वैत नाही मग आम्ही अन्य कोणता परमात्मा प्राप्त करण्याची वाट बघावी? कुठल्या भम्रांचे, सांसारिक बाबींचे ओझे डोक्यावर घेत वाटचाल करावी? वाट नाजुक आहे...
'कबीर इश्क का माता, दुई को दूर कर दिलसे
ये चलना राह नाजुक है, हमन शिर बोझ भारी क्या?
कबीर प्रेमाचा माता म्हणजे मतवाला, मस्त, मस्ताना आहे. द्वैताला मनातून दूर करा.वाट नाजूक आहे. सावध व्हा, खबरदारी घ्या, स्थिती गंभीर - हालात नाजूक.
अशा नाजूक शब्दांतील नजाकत माझ्या मनाला स्पर्शत ईशारत देऊन गेली.
कालौघात पंधराव्या शतकापासून विसाव्या शतकापर्यंत मौखिक परंपरेद्वारे जपल्या-जोपासल्या जाणाऱ्या संतसाहित्याच्या प्रवासात काही पाठभेद आढळून येतात. जसे कबीरांच्या ह्याच गझलेत-
'खलक सब नाम अपने को, बहुत कर सिर पटकता है।
हमन गुरुनाम सांचा है, हम न दुनियासे यारी क्या?'
शेराचा प्रथम मिसरा समान आढळतो; परंतु दुसऱ्या मिसऱ्यात पाठभेद आढळतो तो असा-
'हमन गुरुज्ञान आलिम है, हमन को नामदारी क्या?'
आणखी एक शेर बघा -
'न पल बिछुडे पिया हमसे, न हम बिछुडे पियारे से,
उन्हींसे नेह लागी है, हमन को बेकरारी क्या?'
ह्यामध्ये सुद्धा द्विपदीचा पूर्वार्ध समसमान असला तरी उत्तरार्धात -
'हो ऐसी लव लगी हरदम, हमन को बेकरारी क्या?
असे पाठभेद आढळून येत असले तरी त्यामुळे गझलेंच्या सौष्ठव-सौंदर्यास, रसमाधुर्य आणि संवाद प्रवहनास कुठेच गालबोट लागल्याचे दिसून येत नाही.
हल्ली / आताचे काळी आढळून येणारी, मतला नसणारी 'बेमतला गझल' कबीरांचे साहित्यामध्ये सुद्धा आढळून येते-
सुनता नही धुन की खबर, अनहद का बाजा बाजता।
रसमंद मंदिर बाजता, बाहर सुने तो क्या हुआ ।।
गांजा अफीम और पोसता, भांग और सराबें पीवता।
इक प्रेम रस चाखा नही, अमली हुआ तो क्या हुआ।।
कासी, गया और व्दारिका, तीरथ सकल भरमत फिरै।
गांठी न खोली कपट की, तीरथ गया तो क्या हुआ ।।
काजी किताबें खोजता, करता नसीहत और को,
मरहम नही उस हालसे, काजी हुआ तो क्या हुआ ।।
सतरंज चौपड गंजिफा, इक नर्द है बदरंग की,
बाजी न लाई प्रेम की, खेला जुआ तो क्या हुआ ।।
जोगी दिगम्बर सेबडा, कपडा रंगे रंग लाल से,
वाकिफ नहीं उस रंग से, कपडा रंगे से क्या हुआ ।।
पोथी किताबै बांचता, औरों को नित समुझावता,
त्रिकुटी महल खोजै नही, बक बक मरा तो क्या हुआ ।।
गझलेचे वृत्त आहे मंदाकिनी चतुर्गणी. गा गा ल गा x ४
सतरंज चौ। पड़गंजिफा। इक नर्द है। बदरंग की, बाजी न ला । (गागालगा । ई प्रेम की । गागालगा । खेला जु आ। गागालगा । तो क्या हुआ ।। गागालगा)
सराबें अर्थात वेगवेगळ्या प्रकारचे मद्य. शराब ह्या शब्दाचे तत्कालीन बोलीतील रूप. नर्द म्हणजे नरद, प्यादे (चौपड / चौसर शतरंज वगैरे खेळातील प्यादे, गोटी) जुआं, जुगार कबीरांचे काळीही होताच. जवळपास सहाशे वर्षांपर्वीच्या हिंदुस्तानी गझलांचे परखड, फटकळ रूप मनाला भुरळ घालणारे आहे.
'सुनता नही धुन की खबर' आणि अन्य पदरचनांचा शतक दर शतकाचा अखंडित प्रवास हा लोकगायकांच्या मौखिक गान परंपरेद्वारे घडत आलेलाआहे. त्या कालखंडात साहित्याचे सादरीकरणही मूलतः गायन परंपरा होती. त्यामुळे संतकवींच्या साहित्याचे रूप आणि आकृतीबंध यांमधे अनेक बदल, पाठभेद आढळतात. संत कबीर हे मुळात शास्त्रधाटीचे कवी नाहीत, ते लोकधाटीचे कवी आहेत. भजन-कीर्तना द्वारे त्यांचे साहित्य समाजमनात रुजत राहिले. संतांना प्रतिपाद्य आशय विषय महत्त्वाचा होता आणि काव्याचा आकृतिबंध गौण. त्यामुळे एखादे गझलसमरचनेत उपांत्य स्वर, उपांत्य यमक वा अंत्ययमक नीटपणे राखलेले नाहीत.
जसे 'तो क्या हुआ' या रचनेत आढळते. मग भलेही त्या रचनेस गझल म्हणा वा गझलसदृश रचना. येथे रचनाबंध दुय्यम. प्रतिपाद्य आशय-विषयाचे गानपरंपरेने रसिक श्रवणकर्ते, साधू-साधकांपर्यंत थेट संदेशवहन होणे हे प्रधान उद्दिष्ट असते. संत तुकारामांच्या अनेक अभंगांमधे अक्षराल्पत्व किंवा अक्षराधिक्य आढळते. तरी ते अभंग शतकानुशतके अक्षय्य, अमर आणि अभंगच राहिलेले आहेत.
पढीक विद्वान, बनावटी साधू, दिखावटी भगत यांनी माजवलेले धर्मपाखंड, बाह्याचरणाचे अवडंबर झुगारत, सालपटं-फोलपटं दूर सारत 'निके सत्य' सत्त्व, खरे अध्यात्म सार अलगद आपल्या तळहातावर ठेवतात. आपल्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालतात. तेही स्पष्ट, स्वच्छ, साध्या सोप्या शब्दांद्वारे. कदाचित त्यामुळेच ह्यांच्या साहित्यशैलीचा प्रभाव कबीरांचे परवर्ती संत रैदास, दादू, पलटू, मीरा, मलूकदास ह्यांचे संतसाहित्यावर आढळून येतो. कबीरांची अनेक पदे, भजने प्रसिद्ध आहेत. लोकांच्या ओठीतोंडी ठाण मांडून आहेत, गायक-जनगायक मीडीयायुगात आपल्यापर्यंत पोचवत आहेत. यांपैकी अनेक पदांचे छंद, वृत्ते ही गझलवृत्ते आहेत. ह्या पदांची रचनात्मक बांधणी हिन्दुस्तानी गझलेप्रमाणेच. गझला ह्या कोण्याही एका एकसुरी वाटाव्या अशा वृत्तात वा छंदात रचलेल्या नाहीत तर त्यांच्या गझलांमध्ये वृत्तांची विविधता दिसून येते. एकाच रचनेत विषयबहुलता आढळून येते. थेट संवादकारी प्रकटनांमध्ये डोकावणारी गझलीयत वाचकांस, गायकांस खुणावते असे म्हणण्यापेक्षा झपाटते असेच म्हणावे लागेल. एक गझल बघू, वाचू, गुणगुणत गाऊ म्हणजे चटकन लक्षात येईल.
पडे अविद्या मे सोने वालो, खुलेंगी आखें तुम्हारी कब तक?
शरण में आने को सद्गुरुकी, करोगे अपनी तैयारी कब तक?
गया न बचपन वो खेल बिन है, चढी जवानी ये चार दिन है
समय बुढापे का फिर कठिन है, रहोगे ऐसे अनारी कब तक?
अजब अटारी और चित्रसारी, मिली मनोहर है तुमको नारी ,
बढी है दौलत की जो खुमारी, रहेगी ऐसी ये सारी कब तक?
जो यज्ञ आदिक है कर्म नाना, फल है उन्होका सुख स्वर्ग पाना,
मिटे न इनसे भव आना जाना, सहोगे संकट ये भारी कब तक?
कबीर तो कहते है पुकारी मगर तुम्ही को है अख्तियारी,
सुनो अगर ना सुनो हमारी, बनोगे सच्चे विचारी कब तक?
सुनो अगर ना । सु नो हमारी। बनोगे सच्चे I विचारी तब तक I
लगालगागा ।लगालगागा I
लगालगागा। लगालगागा I
मराठी गझलवृत्तनाम आहे 'स्वरूपकांती.'
(अविद्या- अज्ञान, अनारी - अनाडी, अकुशल, अटारी= अट्टालिका, दोन तीन तालाची माडी (भवन), चित्रसारी- चित्रशाळा, चित्र प्रदर्शन कक्ष, खुमारी - नशा)
अज्ञानाचे अंध:कारात गाढ झोपलेल्या माणसांनो! तुमचे डोळे तरी केव्हा उघडतील? ज्ञानाची प्रकाशवाट दाखवणाऱ्या गुरुला, मार्गदर्शकाला केव्हा शरण जाण्याची तयारी होईल? खेळण्या-बागडण्यात बालपण गेले. जवानी चढली. ती चार दिवसांत ओसरली की पुढे म्हातारपण कठीण आहे. पुढचा काळ कठीण जाण. अजून किती दिवस तू 'अनारी' राहणार? अनाडी, अडाणी राहणार? ह्या अनारी शब्दाची मोठी गंमत आहे. उत्तर हिन्दुस्तानी बोलींमध्ये 'टेकडी ची' कधी टेकरी होते, 'कचोडीची' कचोरी होते, शमीवृक्ष 'केजडी' कधी केजरी होतो ते चटकन लक्षात येत नाही. परंतु अनेक शब्दांमध्ये 'ड/ड़' /ळ ह्या व्यंजनांचा उच्चार 'र' होताना आढळून येतो. जीभेवर अडखळणाऱ्या, तोंडातल्या तोंडात घोळत उच्चारल्या जाणाऱ्या वर्णांबाबत असे आढळून येते. अगदी आपल्या नागपूर-भंडारा भागात बोलभाषेत त्यांच्या नराला (नळाला) पाणी येते, पोरीवर (पोळीवर) तूप चोपडले जाते, घराच्या छताला वा बापाच्या खिशाला गरती (गळती) लागते. मित्र-मित्र वा मायलेक भेटल्यानंतर प्रेमाचा पुरका (पुळका) दाटून येतो की नाही ते आठवा.
कबीरांना आपल्या विषयीची कळकळ आहे, तळमळ आहे. कळवळा आहे. त्यापोटीच प्रेमाचा पुळका आहे. तो येथे व्यक्त होतो. तुमच्यापाशी तीन तालाच्या माड्या आहेत, सुंदर सुंदर चित्रशाला आहेत, तुम्हाला मनोहारिणी सुंदर नारी मिळाली आहे, तुमच्याजवळ धनदौलत भरपूर आहे आणि त्यांच्या नशेत तुम्ही मत्त आहात हे सारे मान्य; परंतु ह्या सर्व गोष्टी कोठवर स्थिर राहतील. त्या अस्थिर, अस्थायी आहेत. कल्पनेतील स्वर्ग गाठण्यासाठी नाना कर्मकांडे करता त्यामुळे काय तुमचे जन्ममरणाचे संकट टळेल? कबीर पोटतिडिकेने सांगतात माझे ऐका वा ऐकू नका; तो तुमचा अधिकार आहे परंतु एवढे मात्र लक्षात असू द्या, तुम्ही सच्चे विचारवान व्हा, विवेकी बना, आता नाही तर मग केव्हा होणार ?
आणखी एक 'वियद् गंगा' ह्या अक्षरगणवृत्तामध्ये रचित धारावाही गझल बघा (ल गागागा x ४)
बने जो कुछ, धरम कर ले, यही एक साथ जायेगा
गया अवसर, न फिर तेरे, ये हरगिज हाथ आयेगा ।।
दिवाना बन के दुनियामे, समय अनमोल खोता है,
दिये लाखों की दौलत भी, न पल रहने तू पायेगा।।
धरी रह जायेगी तेरी, अकल सारी ठिकानेपर
जब आये यम जकड गरदन, पकड कर धर दबायेगा ।।
कुटुम परिवार सुत जोई, सहायक होगा न कोई
तेरे पापो की गठरी खुद, तु ही सिरपर उठायेगा ।।
तुझे तो घर से जंगल मे, तेरा ही खुद ब खुद बेटा
सुलाके लकडियो के ढेर मे तुझको जलायेगा ।।
कहे कब्बीर समुझाई, तु कहना मान ले भाई
नही तो अपनी ठकुराई, वृथा सारी गमायेगा।।
(ठकुराई- ठाकुरकी, स्वामित्व)
लोकांशी लोकांच्या भाषेत बोलल्यास ते पटकन कानात शिरते, गळी उतरते, डोक्यात भिनते. लोकांना ते आपलेसे वाटते म्हणून लोक ते झटकन स्वीकारतात, आपलेसे करतात आणि पुढे तेच आपल्या बोलभाषेत, संवादात बिनदिक्कत वापरतात. कारण ते कायम सत्य असते. पटकन पटते. ते 'बोलतत्त्व' मग केवळ व्यक्तिगत राहत नाही. बेमालूमपणे लोकांच्या ओठी तोंडी रूळत सहजपणे संवादात वापरले जाते. पुढे त्यास आपण म्हण, म्हणी व वाक्प्रचार म्हणतो. सुमारे सहाशे वर्षांपूर्वीच कबीरांनी हे जाणले होते. म्हणून ते सहजपणे त्यांच्या संपूर्ण लेखनात उतरलेले आढळते.
'धरी रह जायेगी तेरी अकल सारी ठिकाने पर' ह्या ओळीमधे 'अकल धरी की धरी रहना' तसेच 'अकल ठिकाने पर आना' अशा वाक्प्रचारांचा सहज वावर आढळतो. पुढे एका गझलेत कबीर म्हणतात- 'धोबी घर के कुत्ता होई हौ, नहि घर का ना घाटका' अर्थात लोकांतोंडी रुळलेला "धोबी का कुत्ता, घर का ना घाटका" तो हाच. एकूणच कबीरांचे लेखनात अशा म्हणी व वाक्प्रचार विपूल प्रमाणात आढळतात. तेव्हा हल्ली प्रचलित लेखन साहित्यामध्ये म्हणी वा वाक्प्रचारांचे वावडे असण्याचे काहीएक कारण नाही. पदाचे / गझलेचे अखेरीस 'कहे कब्बीर समुझाई, तु कहना मान ले भाई' असा तखल्लूस आढळून येतो. कवीला, लेखकाला, गझलकाराला वृत्तबंधाचे अवधान असावे लागते. येथे 'कबीर' चे 'कब्बीर' का आणि कधी होतात? छंदात मात्राल्पत्वामुळे उच्चारणात अडखळू नये म्हणून ही मात्रापूर्ती नाममुद्रेत दिसून येते. पण कबीरांचे हे जागरूकपण सहज आहे. ओढून ताणून आणलेले नाही. योग्य तो समज घेणे.
कबीरांची गझलथाटाची अनेक पदे मात्रावृत्तात सुध्दा आढळून येतात. वानगीदाखल वाचा-
जाग जाग जंजाली जियरा, यह तो मेला हाट का,
धोबी घर के कुत्ता होइ हौ, नहि घर का ना घाट का।
खानिन भ्रमत अमित दुख पायो, मानुष तन यह हाथका,
माथे भार धऱ्यो ममता का, मानो घोडा भांट का।
दुनिया दौलत माल खजाना, जामा दरकस पाट का ,
सोने रूप भंडार भरे है, धरा संदुखा काठ का।
आये संत आदर न कीन्हों, धंध किहो घर घाट का
कहहि कबीर सुनो भाई साधो, भयो किरौना खाट का।
'जंजाली जियरा' हा प्रपंचात गुरफटलेला जीव. जीया, जियरा असे त्यास संबोधन. 'जिया लागे ना.....' वा जियरा ना लागे...अशा गीतांमधे अनेकदा आपण ऐकतो. पण त्यातील प्रेम, सौन्दर्य अलगद निसटून जाते. कबीर त्यास ठसठशीत करतात. 'भाडे का तट्टू' पण येथे ठाण मांडून आहे- "घोडा भांट का" अर्थात भाड्याचा घोडा. जामा अर्थात वस्त्र, कपडे ते ही रेशमी (पाट का) ते ठेवायला दरकस म्हणजे वस्त्रांची छोटी पेटी, सोबत धनदौलत, माल-खजाना, सोने, रूप अर्थात रुपे, चांदी ह्यासाठी 'संदुखा' म्हणजेच लाकडी (काठ) पेटी असा एकूण जामानिमा.
मनुष्या, तू संतांचा आदर केला नाहीस, भोगविलासार्थ संसाराचा धंदा करत राहिलास, संसार जंजाळात कायमचा अडकलास तर तू माणूस नाहीस तर लाकडी खाटेतील कीडा आहेस. जसे ढेकूण वा तत्सम कीडा. किरौना म्हणजे कीडा. भाषेचे हे वैभव, सौंदर्य अनुभवा.
कबीरांनी आपल्या साहित्य रचनांमधे जागोजागी मुक्त हस्ताने भाषा सौंदर्याचा, भावसौंदर्याचा व अनमोल शब्दरत्नांचा असा दौलतजादा केलेला दिसून येतो. हे मात्रावृत्त आहे (८+८+८+ ५) 'प्रियलोचना' नामक पद्मावर्तनी वृत्त.
आणखी काही मात्रावृत्तातील ओळी वाचू -
माल जिन्होने जमा किया, सौदा परिहारे जाते है।।
उंचा नीचा महल बनाया जा बैठे चौबारे है।
सुबह तलक जो आगे रहता, साम पुकारे जाते है।।
जग के रस्ते मत चल प्यारे, ठग व्यापार घनेरे है।
इस नगरी के बीच मुसाफिर अकसर मारे जाते है।।
जोरु कौन खसम है किसका, कौन किसी के नाते है।
कहै कबीर जो बंदगि गाफिल, काल उन्ही को खाते है।।
या गझलपदाचे मात्रावृत्त आहे हरिभगिनी / स्वरगंगा (पद्मावर्तनी- ८।८।८।६ मात्रा) कबीरांनी अध्यात्ममार्गातील थोतांडांवर , पाखंड आचरणावर जबरदस्त प्रहार केलेले आहेत. आपली पदे, उलटबांसीया व दोहा, सांखीयांव्दारे सोप्या शब्दांमध्ये समाजमनाच्या कानीकपाळी पोहोचवले. त्यामध्ये काही गझलवृत्ते वापरलेली आहेत. काहीतर परिपूर्ण गझला आहेत. अक्षरगणवृत्ते आणि मात्रावृत्ते सहजपणे वापरलेली आहेत. काही सुटया व्दिपदी आपण वाचू -
करि असनान, छुवो नहि काहू, पाती फुल चढाये
मूरति से दुनिया फल मांगे, अपने हाथ बनाये।
झूठी काया झूठी माया, झूठे झूठ लखाये
बांझिन गाय दूध न दे है, माखन कहँ से पाये।
सांचे के संग साँच बसत हे, झूठे मारि हटाये
कहैं कबीर जहँ साच वस्तु है, सहजे दरशन पाये।
ह्या व्दिपदी 'लवंगलता' मात्रावृत्तातील (८।८।८।४) असून पुढे उद्धृत गझलपद मुळात उलटबांसी असून ह्याच पद्मावर्तनी वृत्तामधे रचलेले आहे. मनुष्य आपल्याच हातांने मूर्ती तयार करतो.स्थापतो. त्या मूर्तीस स्नान, अभिषेक घालतो. स्वतः स्नान करतो. स्पर्शास्पर्शता पाळतो. मूर्तीवर फूलपाती अर्पितो. आणि अखेरीस त्या आपण निर्मिलेल्या मूर्तीकडेच फळ मागतो, वरदान मागतो अशी दुनियेची रीत. कबीर अशा भक्तीचे फोलपण दाखवून देतात.आपल्याकडे मराठीत संत एकनाथांची भारुडे ज्याप्रमाणे सत्यदर्शी व हृदयस्पर्शी असून त्यांची मांडणी रचना चमत्कृतीपूर्ण असते तसा हा रचनाप्रकार. ज्ञानेश्वर माउलींच्याही काही अशा स्वरुपाच्या अभंग रचना आढळून येतात. संत-साहित्याचा परिचय असणाऱ्यांना हे नवीन नाही.
झूठे के घर झूठे आया, झूठे ते परिचाया
झूठी थारी झूठा भोजन, झूठे ले सब खाया।
झूठे के घर झूठा आया, झूठे ब्याह रचाया
झूठा दूल्हा झूठी दुलहिन, झूठे ब्याहन आया।
झूठे नर सब झूठी नारी, झूठे बालक आया
झूठी छाती झूठी कोखी, झूठा दूध पिलाया।
साँच कहूं मै झूठ न बोलू, साँचे को झुठलाया
कहै कबीर सोड़ जन सांचा, अपने माहि समाया।
अशा तऱ्हांनी कबीर त्यांचे गझलांव्दारे खोट्यांशी आपला परिचय करुन देता देता खऱ्याची पक्की ओळख करुन देतात. संत कबीरांनी इसवी सनाच्या पंधराव्या शतकात गझला लिहिलेल्या आढळणे हा मला आश्चर्याचा धक्का होता; तो ही आनंददायी. आपणास ह्या आनंदात सहभागी करुन घेण्यास हा प्रपंच.
....................................................