काही दिवसांपूर्वीची गोष्ट! जुनी पुस्तके आवरत होतो. जणू काही एखादा खजिनाच सापडावा असे वाटले. त्यातच मला सुरेश भट आणि अविनाश कांबळे यांनी संपादित केलेला ‘काफला’ हा प्रातिनिधिक गझल संग्रह दिसला आणि अनेक आठवणी मनात दाटून आल्या.
१९९० सालचा तो काळ होता. सुरेश भटांच्या जोरकस गझलांनी अख्खी तरुण पिढी भारून गेली होती.
'एक साधा प्रश्न माझा, लाख येती उत्तरे !
हे खरे की ते खरे की ते खरे की हे खरे?'
'कारणावाचून माझा शोध घेती कारणे …
अन् कुणा ठावे मला मी विस्मरे किंवा स्मरे?'
सारख्या ओळी आम्हा तरुणांच्या ओठांवर खेळत होत्या.
'नाही म्हणावयाला आता असे करू या -
प्राणात चंद्र ठेवू - हाती उन्हे धरु या !'
'आता परस्परांची चाहूल घेत राहू …
आता परस्परांच्या स्वप्नात वावरू या !'
सारख्या प्रेयसीला साद घालणाऱ्या मनमोहक गझला तरुण हृदयाचा ठाव घेत होत्या.
अशा या भारलेल्या कालखंडात महाराष्ट्रातली तरुण पिढी गझलेकडे आकृष्ट झाली नसती तरच नवल! दादांनी (सुरेश भट) या तरुण गझलकरांच्या पिढीला अक्षरशः रक्ताचे पाणी करून घडवले. प्रत्येक गझलकाराला वैयक्तिक मार्गदर्शन करून, त्यांच्या गझलांवर संस्कार करून, त्यांच्या गझला विविध सदरांत प्रकाशित करून त्यांनी त्या पिढीला लिहिते केले.
त्यातले अनेक नवोदित गझलकार पुढे मान्यताप्राप्त गझलकार झालेत. इतकेच नव्हे तर त्यांनी सुरेश भटांचे व्रतही पुढे चालवले. उदा. प्रदीप निफाडकर, डॉ. श्रीकृष्ण राऊत, दीपक करंदीकर, म.भा. चव्हाण, इलाही जमादार, वा. न. सरदेसाई, अरुण सांगोळे, प्रशांत वैद्य, संगीता जोशी, शोभा तेलंग, राजेंद्र शहा, दिलीप पांढरपट्टे इत्यादी.
‘काफला’ मध्ये स्त्री गझलकारांची उपस्थिती पण उल्लेखनीय होती. उदा. शरयू आसोलकर, दीपमाला कुबडे, संगीता जोशी, अनुराधा टल्लू, कविता डावरे, शोभा तेलंग, नंदिनी पाटील, भारती पोतदार, प्रतिभा नंद फडके, ज्योती बालिगा-राव, नीता भिसे इत्यादी.
‘काफला’ मध्ये दमदार लेखन करणारे अनेक गझलकार दुर्दैवाने आज आपल्यात नाहीत, याचे दुःखही मनात जागे होते. खावर, दीपक करंदीकर,अनिल पाटील, अनंत भीमनवार, इलाही जमादार, मधुसूदन नानिवडेकर इत्यादी.
त्यामुळे हा गजल संग्रह पुन्हा वाचताना संमिश्र भावना मनात निर्माण होतात.
प्रस्तावनेतच लिहिल्याप्रमाणे ‘काफला’ मधले बहुतेक गझलकार १९८० च्या सुमारास गझलेकडे वळले होते. एकूण ७३ गझलकरांचा यात समावेश आहे. बहुतेक गझलकार तरुण असल्यामुळे सगळ्यांच्या गझला बहारदार आणि तजेलदार वाटतात.
उदाहरणादाखल सुनील देशपांडे यांची ‘जात’ ही गझल पहा -
'देऊ कसा कुणाच्या हातात हात आता ?
माझा प्रवास होई माझ्या मनात आता !'
'ते फेडती असेही ऋण पाजल्या दुधाचे
एकेक दंश येतो बदलून कात आता …'
'काट्यांसही फुलांनी मुजरे हजार केले …
माझी कशी वसंता, पुसतोस जात आता !'
अशा एकापेक्षा एक उत्तम गझला या संग्रहात आहेत. थंड वाऱ्याची झुळूक यावी तशा या गझला आपल्याला आनंद देतात. किती गझलांचा उल्लेख करावा? मतले जरी वाचले तरी या गझलांमधील सामर्थ्य लक्षात येते. बऱ्याचशा गझलांवर सुरेश भटांची छाप दिसून येत असली तरीही या गझला वेगळ्यापण आहेत. काही उदाहरणे खाली देत आहे.
'जरी भेट वाटेतली टाळतो मी
तुला पाठमोरीच न्याहाळतो मी'
(वि.ना.उरणकर)
'तू चोरपावलांनी येऊ नकोस आता
स्वप्नातल्याप्रमाणे हे राजरोस आता !'
(दीपक करंदीकर)
'नको आज फोडू टाहो,अगा चूप राही !
निजू देत माझी दुःखे, ढगा चूप राही !'
(रामदास कुहीटे)
'ठेवतो हा चोख बंदोबस्त मी
घालतो साऱ्यात माझ्या गस्त मी'
(कवी खावर)
'सोयरा एकेक माझा थोर होता …
… हा लफंगा … तो दरोडेखोर होता… !'
(म. भा. चव्हाण)
'सोडली केव्हाच चिंता माणसांची
लागली आम्हास घाई स्मारकांची'
(प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी)
'माणसे सारीच येथे मूक होती
बोललो मी, तीच माझी चूक होती !'
(मधुसूदन नानिवडेकर)
'गडे, काय झाले पहाटे पहाटे
कसे भान आले पहाटे पहाटे …
असा रंग आला नभाला गुलाबी -
तुझे ओठ प्याले पहाटे पहाटे …'
(प्रदीप निफाडकर)
'चुपचाप रात्र माझी सजवून येत जा तू
हळुवार हात माझ्या हातात देत जा तू'
(अनिल पाटील)
'खोट्याच भाविकांचा पण काय रंग आहे?
आता विठूवरी या बाका प्रसंग आहे .. !'
(नंदिनी पाटील)
'पोटात शूळ, ओठी हसणे उदार आहे
लाचार चेहऱ्यांच्या टोपीस धार आहे'
(अनंत भीमनवार )
'ती मला गीते अशी देऊन गेली
लेखणी माझ्या उरी पेरून गेली'
(राजा मिसर)
'तापतो आत लाव्हारसासारखा
सांग, मी शांत राहू कसा सारखा !'
(प्रा. श्रीकृष्ण राऊत)
'दुःखितांना दुःख जेव्हा आवडायला लागले
सांत्वनानांही बहाणे सापडाया लागले !'
(राजेंद्र शहा)
'रुजून तू दिलेस अन् फुलायचेच राहिले..
उन्हास श्रावणातल्या भिजायचेच राहिले !'
(वा. न. सरदेसाई)
'मी तुला तारका देत गेलो
अन् तुझी आसवे घेत गेलो'
(बबन सराडकर)
'जीवनाची कुठे हमी आहे ?
श्वास एकेक मोसमी आहे !'
(अरुण सांगोळे)
'स्वराज्य मागण्या मला मुहूर्त पांगळा नको
मृतासमान हा मला जिवंत आंधळा नको'
(गजानन चिंचवडकर)
आणि या सगळ्यावर ताण म्हणून साक्षात सुरेश भटांनी आपली एक जबरदस्त गझल या सगळ्या नवोदितांसोबत छापली होती ! ही गोष्टच त्यांच्या मनाच्या मोठेपणाची, उमदेपणाची साक्ष देते !
ही गजल इतकी सुंदर आहे की त्यातले काही शेर देण्याचा मोह आवरत नाही.
'पडतात रोज कानी बकवे तऱ्हेतऱ्हेचे
निघतात बादशाही फतवे तऱ्हेतऱ्हेचे
कोणी मुकाबलाही केला न ऐनवेळी
दडले घरात सारे नटवे तऱ्हेतऱ्हेचे
समजूत मी मनाची घालू कशी कळेना
रुसवे तऱ्हेतऱ्हेचे ! फुगवे तऱ्हेतऱ्हेचे !
एकाच चेहऱ्याला मी आठवू कशाला?
जखमी करून गेले बिचवे तऱ्हेतऱ्हेचे !
दुनियेत वाटले मी आकाश पावसाळी
हृदयात कोंडले मी वणवे तऱ्हेतऱ्हेचे'
केवळ अप्रतिम म्हणावी अशी ही गझल वाचून तर दिल खुश होऊन जाते !
‘काफला’ प्रकाशित होऊन आता तब्बल ३४ वर्षे उलटली आहेत. या प्रदीर्घ कालखंडात बरीच उलथापालथ झाली आहे ! स्वतः सुरेश भट दुर्दैवाने आता आपल्यात नाहीत. अनेक नवोदित गझलकारांनी त्यांचे गझल लेखन थांबवले आहे. प्रा. राम पंडित यांच्या अभ्यासपूर्ण “मराठी गझल: अर्धशतकांचा प्रवास” या पुस्तकात दिल्याप्रमाणे ‘काफला’ मधील ७३ गझलकारांपैकी ५० जण नंतर मौन झाले, त्यांचे गझल लेखन बंद झाले किंवा त्यांनी इतर लेखन प्रकाराकडे लक्ष वळवले.
माझ्या स्वतःच्या बाबतीत बोलायचं झाल्यास माझी “गाणी” नावाची गझल यात होती. तरुण वयात भावनेच्या आवेगात लिहिलेली ही साधारण गझल, पण सुरेश भटांचा परिसस्पर्श या गझलेला झाला.
'माझी कशी लिहू मी वाऱ्यावरी कहाणी ?
ही सांजवेळ माझी गाई तुझी विराणी !
मीही कुणाकुणाला सांगून काय सांगू ?
बांधून ठेवली मी माझी अबोल वाणी !
तेव्हा जरी लकेरी मी वेचल्या फुलांच्या
आता मनात गातो गाणी उदासवाणी !'
परंतु पुढे काळाच्या प्रवाहात, आयुष्याच्या संघर्षात गझललेखन मागे पडले आणि मी विनोदी लेखनाकडे माझा मोहरा वळवला. आज महाराष्ट्रातील प्रमुख विनोदी दिवाळी अंकांमध्ये माझे साहित्य प्रकाशित होते. तीन विनोदी कथासंग्रह आणि एक विडंबन काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे.
परंतु मनाच्या कुठल्यातरी खोल, हळव्या कप्प्यात मराठी गझल पक्की रुतून बसली आहे. त्यामुळेच आजही एखादी सुंदर गझल वाचली तर आपसूकच दाद दिली जाते. याच भावनेतून दरवर्षी ‘गझलकार’ मध्ये काहीतरी आवर्जून लिहितो. त्यामुळे तरी आपली गझलेशी नाळ जुळून आहे याचे एक आंतरिक समाधान मनाला वाटते. ‘ गझलकार’ ने सुद्धा ‘काफला’ प्रमाणेच मराठी गझलेला जिवंत ठेवण्याचे अमूल्य कार्य निष्ठेने केले आहे असे मला वाटते.
‘काफला’ पहिली आवृत्ती कॉन्टिनेन्टल प्रकाशनने १९९० मध्ये प्रकाशित केली होती. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक गझलकाराचे उत्तम छायाचित्र आणि अल्प परिचयही दिला होता. परंतु ही आवृत्ती आता उपलब्ध नाही.
त्याची दुसरी सुधारित आवृत्ती डॉ. अविनाश सांगोलेकर यांनी संपादित केली आहे. हे पुस्तक अजूनही बुकगंगा वर उपलब्ध आहे. ज्या रसिकांना मनापासून गझलेची आवड आहे, त्यांना विकत घेऊन ते वाचता येईल.
मराठी गझलचा इतिहास जेव्हाही लिहिला जाईल त्यामध्ये ‘काफला’ चे नाव सुवर्ण अक्षरात लिहिले जाईल, यात शंकाच नाही. ‘काफला’ हा मराठी गझलेच्या इतिहासातील एक मैलाचा दगड ठरला आहे. आज जो मराठी गझलेचा महावृक्ष उभा राहिला आहे, त्याचे बीज ‘काफला’ मुळेच रोवल्या गेले होते, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. या संग्रहामुळे महाराष्ट्राला अनेक प्रतिभाशाली गझलकार लाभलेत. अनेकांना गझल लिहिण्याची प्रेरणा मिळाली.
आजही कधी जेव्हा कधी मन हळवं होतं, तेव्हा मी ‘काफला’ची प्रत कपाटातून बाहेर काढतो आणि कुठल्याही पानापासून गझल वाचायला सुरुवात करतो. त्यामुळे मन जणू ३४ वर्षे मागे उडून जातं आणि गझलकारांच्या त्या अभूतपूर्व काफिल्यात पुन्हा एकदा उत्साहाने सामील होतं !
'कुण्याही चंद्रभागेचा किनारा प्यार आम्हाला
तिथे नाचे विठू झेंडा जिथे हा रोवतो आम्ही !
दिले प्रत्येक वस्तीला अम्ही आकाश सोनेरी
जिथे जातो तिथे हाका उषेच्या वाटतो आम्ही !
(सुरेश भट )
....................................................
अविनाश चिंचवडकर,
बंगलोर
9986196940
