निर्मला सोनी यांचा पहिला गझल संग्रह, 'तू गुंतला असा की' जेव्हा माझ्या हातात पडला तेव्हा गझलकार संदीप वाकोडे सरांचे गझलदीप संमेलन होते. त्या वेळी निर्मला सोनी मॅडमला सुद्धा पुरस्कार जाहीर झाला होता. त्या संमेलनात माझी आणि निर्मला सोनी यांची पहिली भेट झाली होती. मी गझल क्षेत्रात नवखे होते. पण थोडी थोडी गझलेची बाराखडी वाचत होते.
झाले असे की, निर्मला सोनी आणि मी जवळजवळ बसलेलो होतो. निर्मला सोनी यांचा स्वभाव हा प्रेमळ, बोलका, मैत्रीपूर्वक आहे याची मला खात्री झाली. त्यांनतर आमची लवकरच मैत्री झाली. त्यांनी मला त्यांचा गझल संग्रह 'तू गुंतला असा की' भेट दिला. मी तो गझलसंग्रह पाहून अगदी भारावून गेले. निर्मला सोनी म्हणाल्या, "गझलसंग्रह आवडला तर यावर दोन शब्द लिहा." मी हो म्हटले. पण लिहण्याची हिंमत होईना.
नंतर दोन वर्षांनी निर्मला सोनी यांचा दुसरा गझल संग्रह , 'हा खेळ भावनांचा' आला. त्या गझलसंग्रहाचे प्रकाशन मुर्तिजापूरला करायचा मानस आहे असे त्यांनी मला सांगितले. मी संदीप वाकोडे सरांची मदत घेतली. वाकोडे सरांच्या मदतीने या गझलसंग्रहाचे प्रकाशन गझलदीप प्रतिष्ठान अंतर्गत करण्यात आले. वाकोडे सरांनी कोणतेही आढेवेढे न घेता मदत केली. त्या प्रकाशनासाठी आलेल्या निर्मला सोनी माझ्या घरी मुक्कामी होत्या. त्या भेटीमधून चांगलीच चर्चा गझलेवर झाली.
मला निर्मला सोनी यांच्या दोन्ही गझलसंग्रहावर लिहायचे होते. या गोष्टीलाही जवळपास दोन वर्षे होत आली असणार. पण वेळेअभावी मी लिहू शकले नाही. मग विचार केला, निर्मला सोनीताईचा तिसरा गझलसंग्रह येण्याअगोदर लिहावे. एकंदर असा प्रवास आहे या मागचा.
गझल मानवी मनाला चैतन्य देणारी अज्ञात शक्ती आहे. ही गोष्ट आयुष्यभर जाणवत असते. पण तिचे दृश्य स्वरूप कधीच सापडत नाही. गझल म्हणजे मानवी मनाला झालेला परिसस्पर्श. गझल म्हणजे दुःखाला समजून घेण्याचे औषध. गझल म्हणजे सृजनशीलतेमधून साकारलेली प्रतिभा आणि विचारांचे मूर्त स्वरूप. विचारांची आशयघनता. असे तरल विचाराने प्रेरीत झालेल्या कवयित्रीचे विवेकसिंधूसारखे विचारधन आहे.
'तू गुंतला असा की' या गझलसंग्रहातील एक रचना आहे. बघा ! प्रेमातील सारी तरलता , हळुवारपणा , नज़ाकत, व्याकुळता कवयित्रीने कशी टिपली आहे बघा.
'तू गुंतला असा की जगण्यास वेळ नाही
अन् सांगतो जगाला मरण्यास वेळ नाही'
'गाणार गीत केव्हा तू सांग जीवनाचे
जेव्हा तुलाच वेड्या हसण्यास वेळ नाही'
अशा साऱ्या भावभावनांना कवेत घेऊन , चक्क नभाशी गुजगोष्टी करून येणारी लेखिका म्हणजे निर्मला सोनी होय. मानवी जीवनाचा विविध दशेतील अनुभवांचा , भावभावनांचा चढ-उताराचा, सुखदुःखाचा, हास्य आणि अश्रूंचा मीलाप, तसेच मीलन आणि विरहाचा, राग, संयमाचा हा गझल संग्रह 'तू गुंतला असा की' यामधील रचना आहे. कवयित्री जीवनाचे सत्य गझलेतून मांडत आहे.
बघा तर ,
'कुणी नाही कुणाचे रे जगाला सांगते आहे
जसे दिसते तसे नसते मनाला सांगते आहे'
व्वा ! किती सहजतेने दुनियेची दुनियादारी कमी शब्दांत मांडलेली आहे. यामधून कवयित्रीचे एकटेपण ती व्यक्त करते आहे. हा शेर संपूर्ण मानवतेला नवा दृष्टिकोन देत आहे. मनाची व्याकुळता मांडत आहे. अशा साऱ्या सुखदुःखाच्या हिंदोळ्यावर बसून लेखिका गगनाला गवसणी घालते आहे. मानवी मनावर समाज जीवनाचे तसेच सहजीवनचे प्रतिबिंब साहित्यात पडलेले दिसून येते. गझल हा प्रकारच लोकप्रिय साहित्याचा महत्त्वाचा घटक आहे. गझलांच्या परिप्रेक्ष्यातून पाहता गझलेला व्यापक रूप आले आहे. समाजाच्या सर्व थरात गझल समीक्षा होऊन जीवन काव्याचे रसग्रहण करून जीवनाचे मर्म कथन करते. अगदी तसेच कवयित्रीने सुबोधरितीने आपले दुःख, वेदना, आक्रोश, नव्या आविष्कार पद्धतीने मांडल्या आहेत.
निर्मला सोनी यांचा पहिला गझलसंग्रह 'तू गुंतला असा की' २०१७ ला प्रकाशित झाला. मुखपृष्ठ पाहता क्षणीच मनाला भावते! प्रख्यात गझलकार रमेश निनाजी सरकटे सरांची प्रस्तावना या गझलसंग्रहाला लाभलेली आहे.
निर्मला सोनी सुरुवातीला फेसबुकवर हिंदीत द्विपदी, कविता सतत पोस्ट करायच्या. त्या रचनेत मानवी मनाचे दुःख, विरह, यातना हे असल्याने सर्वांना आपल्याच जीवनातील हा शेर वाटतो आहे. असे वाचक वर्ग मिळू लागल्याने लेखिकेने गझलसंग्रह काढला. त्याचेच फळ म्हणून आज गझल सुगंधरूपी जनमानसात गुंतलेला आहे. या गझलसंग्रहाचे नावच असे आहे की, 'तू गुंतला असा की.'
कवयित्री आयुष्याला विचारते आहे -
'आयुष्याला गीत म्हणाले, चुकले कोठे?
या जगण्याला प्रीत म्हणाले चुकले कोठे'
'कैफ जगाला का जगण्याचा समजत नाही
मृत्यूला मी जीत म्हणाले , चुकले कोठे'
असा जबरदस्त सवाल आयुष्याला करीत असताना मृत्यूला जीत म्हणाले तर चुकले कोठे ? असा जीवनाचा खरा आशावाद लेखिका मांडत आहे. हे गझलेतून मांडणे म्हणजे एक कौशल्य आहे.
एका ठिकाणी निर्मला सोनी मोठ्या खंबीरपणे म्हणते की,
'झुकणे कबूल नाही मरणे कबूल आहे
हातून जीवनाच्या लुटणे कबूल आहे...'
व्वा! सुंदर !! अशा परिपूर्ण जीवनाच्या सेंद्रीयतेच्या सौंदर्यगंधाने सजलेल्या आहे.
अगदी तसाच २०२१ मध्ये, निर्मला सोनी यांचा दुसरा गझलसंग्रह, 'हा खेळ भावनांचा' आला. या गझलसंग्रहाला अमरावतीचे प्रा. अशोक पळवेकर सर यांची प्रस्तावना लाभलेली आहे. या गझलसंग्रहातील गझला वाचताना, प्रेम जाणिवेच्या तीव्र लाटा मनोभूमीवर आदळतात. त्यांचे लिखाण हे सर्वंकष होत आहे. जीवनाचा गाभार्थ आणि भावार्थ यांचा संगम म्हणजे निर्मला सोनी होय.
'हा खेळ भावनांचा' यामध्ये बघा त्या काय म्हणतात -
'कळेना काय हे घडले ...तुझ्या एका नकाराने
उभे आयुष्य हादरले ....तुझ्या एका नकाराने'
मनातील भावनांना चिमटीत पकडून कवयित्री मनोभूमीवर त्यांचे शब्दांचे कण पेरते. ते शब्द बीज होऊन दुःखाशी सहजतेने मिसळतात. 'उभे आयुष्य हादरले .... तुझ्या एका नकाराने' किती तरलता, सहजता, अमाप शब्दभांडार, वेदना, विरह, दुःख, आक्रोश हे सप्तभूषणे कवयित्रीचे झाले आहेत जणू.
पुढे जाऊन कवयित्री अशी म्हणते -
'का परीक्षा देव माझी घेत आहे
वाटते शिक्षा जणू तो देत आहे'
तसेच हाच प्रश्न मग त्या विठ्ठलाला विचारतात,
'रंग हा कोणता लाविला विठ्ठला
मेघ काळा जणू भासला विठ्ठला'
'नाव घेता तुझे मुग्ध होई कुणी
छंद न्यारा तुझा लागला विठ्ठला'
अशी साधकबाधक चर्चा सुद्धा त्या विठ्ठलाशी करतात. अशी त्यांची लेखणी झेप घेत आहे.
त्यांच्या गझल दुःखाच्या परीघात नेतात आणि हळूच बाहेर काढतात. वाचकांना प्रेम जाणिवांच्या तीव्र वेदना होतात.
कवयित्रीचा जीवन संघर्ष, आपल्याला त्यांच्या गझलेतून दिसतो. तसेच स्वप्नभंगाचे जीवन मांडताना त्या तटस्थपणे राहतात. आपल्या रचनेतून मनाची कैफियत मांडत असताना ते दुःख त्यांचे राहात नाही, तर ते इतरांचे होऊन जाते. हीच कमालीची ताकद गझलकारा निर्मला सोनी यांच्या गझलेत प्रतिबिंबित होते.
.................................
सुनीता इंगळे,
मुर्तिजापुर
7218694305

