Showing posts with label प्रा मोहन काळे. Show all posts
Showing posts with label प्रा मोहन काळे. Show all posts

तीन गझला : प्रा मोहन काळे

 



१.

करावे कितीही तरी नाव नाही
मला पाहिजे ते खरे गाव नाही

दिले वाटले मी जवळपास होते
कशाची कशी ती मला हाव नाही

मनी शुद्ध माझ्या करूणा तळाशी
असूया अहं ला मुळी वाव नाही

सदा तोंड देतो उभ्या संकटांना
रडीचा कधी खेळलो डाव नाही

मुखवटे मुखावर चढवले कितीही
जगी चोर सारे कुणी साव नाही

मनावर जखम ती अशी खोल झाली
दिसावा जगाला असा घाव नाही

बिलंदर जमवती जगी खूप माया
इथे चांगल्याला मुळी वाव नाही

पिकवतो बळी कष्ट करुनी पिकाला
तरी त्या पिकाला मिळत भाव नाही

धरा खास संगत अशा माणसाची
जयाला कसे ते व्यसन ठाव नाही

विचारांत मोहन जगाला धरावे
स्वतःच्या पुढे ती तुझी धाव नाही

२.

किती खपते घरासाठी कुणा हे का कळत नाही
तरी चिंता तिची थोडी कुणीही का करत नाही

शमवते भूक सर्वांची तिच्या पोटीच खळगा का
तिच्यासाठी कधी अश्रू कुणाचा का गळत नाही

जपत जाते कुटुंबाला कसोशीने नि कष्टाने
तरी मग का तिला आपण हिशेबातच धरत नाही

तुम्ही करता घरी आराम दिनभर काम ती करते
तरी का काम सांगूनी तुम्ही थोडे थकत नाही

घराचा केंद्र बिंदू अन् घराची शान ती असते
समजुनी घ्या घरी नसली घराला का गमत नाही

मुलांचे विश्व ती असते मुले छोटीच असताना
मुले झाल्यावरी मोठी तिला जागा उरत नाही

तिच्यातच ईश्वराचा अंश समजा हे तुम्ही सगळे
तुम्हांला हे कळत जाते जरासे का वळत नाही

तिला जगवा तिला हसवा करा प्रीती तिच्यावरही
घराचा स्वर्ग ती करते कसे कोणा पटत नाही

३.

जो हे म्हणतो  अन्यायाला वाचा फोडा 
बाकी म्हणती याची आता संगत सोडा

पद्धतशीरच चालत असते जेव्हा सगळे 
कोणी येतो घालत बसतो त्यातच खोडा

लोकांनी जे म्हटले ते जो ऐकत नाही
स्पर्धेमध्ये धावत जातो त्याचा घोडा

फोडाफोडी लावालावी त्यांच्या सवयी
पण तुमच्याने जितके होइल तितके जोडा

अन्यायाने नागविले जन ज्यांनी ज्यांनी
ठरवा निश्चित सगळे मिळुनी त्यांना झोडा

भ्रष्टाचाराबाबत त्यांना हिणवत बसतो
खाल्ले थोडे मीही मिंधा थोडा थोडा

सांगत जा रे मोहन थोडे इतरांनाही
जाती-धर्मांमधले आता बंधन तोडा

.................................
प्रा. मोहन ज्ञानदेवराव काळे, अकोला
मो.७०३८२७६५५८