१.
घर सजलेले वरवर आहे
आत छुपे पण तळघर आहे
गाठीभेटी...संवाद कुठे
माणुसकीला घरघर आहे
येवोत किती वादळवारे
बापाचे मज छप्पर आहे
हवा कशाला गर्व मानवा
जीवन जर का नश्वर आहे
नव्या योजना, नव्या घोषणा
इच्छा कोठे नवथर आहे?
स्पष्ट सांग ना नकार आहे
कशास आता जर-तर आहे?
मनात व्याप्ती वाढत नाही
हाच खरा तर अडसर आहे
२.
खरे काय ते बोललेले बरे
हसे व्हायचे टाळलेले बरे
मनातून नाती जपावीत तर
अहं आपले सोडलेले बरे
तडा जात आहे जरासा कुठे
लगोलग तिथे सांधलेले बरे
कुणी द्वेष पेरीत जाती इथे
तणाला अशा काढलेले बरे
हिरावून आनंद घेतो जरा
असे दुःखही गाडलेले बरे
३.
लागेल हारताना तेव्हा निभाव माझा
टाकून पान हुकमी जिंकेन डाव माझा
नसतो नकार केव्हा काही करायलाही
गुंतून घ्यायला हा नडतो स्वभाव माझा
जे जे करीन ते ते निःस्वार्थ भावनेने
आहे असा स्वतःशी झाला ठराव माझा
झाले करून थोडे नाहीच चालणारे
सातत्य राखले तर आहे टिकाव माझा
कोठे, कधी, कसा पण छंदास वेळ द्यावा?
देते उगाच कारण लटका बचाव माझा
....................................................
मुग्धा कुळये
रत्नागिरी
