१.
स्मरणामधल्या जीर्ण वहीची पाने चाळून बघते
जुन्या व्यथेला पुन्हा नव्याने ती कवटाळून बघते
इथे मनाची फारच तगमग होते आहे तरीपण
दुरावलेले नाते हृदयी बघ सांभाळून बघते
तुझे भेटणे ही चाहुल तर नाही ना वादळाची
म्हणून मीही क्षण भेटीचे उगाच टाळून बघते
समजू नकोस निव्वळ शब्दांची ही पोकळ कहाणी
तुला सजवण्या अश्रूंनाही गजले माळून बघते
माझे माझे करता करता किती एकटी जाहले
वेळेआधी अहंपणाला अलगद गाळून बघते
२.
जन्मलो जिथे त्या सृष्टीचे कर्ज फेडतो आपण सगळे
कर्तृत्वाची जाण ठेवुनी ध्येय गाठतो आपण सगळे
झाले गेले विसरुन सारे वेळ काढुनी नाते जपतो
धावपळीच्या जगामधेही मान राखतो आपण सगळे
हात कटीवर इथे ठेवुनी युगेयुगे हा उभा कधीचा
वीट सोडुनी तो येण्याची वाट पाहतो आपण सगळे?
तुझ्या नि माझ्या विश्वासावर टिकून आहे दुनिया सारी
बघा तरीही विश्वासावर घाव घालतो आपण सगळे
अर्ध्या अधुऱ्या देहामधल्या प्राणाचा तो मालिक आहे.
तरी केवढे आयुष्यावर हक्क सांगतो आपण सगळे
शिखर गाठण्या ताकत आहे मनगटात या तरी इथे मग
दगडाला का दान यशाचे उगा मागतो आपण सगळे
३.
साऱ्यापेक्षा किती वेगळी
आयुष्याची कथा सावळी
अंगाभवती व्यथा लपेटुन
सदैव हसते एक बाभळी
वाऱ्यासंगे फिरून येते
पायामधली बंद साखळी
स्वप्ने सारी तुडवत नेली
अशी कशी ही हवा वादळी
आठवणीची उरली सुरली
गळून गेली एक पाकळी
उसवत गेल्या जखमा ओल्या
तशी पसरली पुन्हा काजळी
कुठे, कधी अन् कुणास ठाऊक
जडली मजला प्रीत आंधळी
....................................................
शीतल कर्णेवार
देवाडा