Showing posts with label अरुण विघ्ने. Show all posts
Showing posts with label अरुण विघ्ने. Show all posts

तीन गझला : अरुण विघ्ने

  



१.


माझ्यासोबत जशी वागली, 

तशी वागते माझी आई

सराव त्याचा घेण्यासाठी,

रोज जागते माझी आई


शिक्षित नसली तरी विचारी,

बुद्धीने ती हुशार आहे

नव्या पिढीच्या नातवासही,

बुद्ध सांगते माझी आई


संसाराची घडी बसविण्या, 

बापासवे नित्य राबते 

पोटासाठी कष्ट उपसता,

किती भागते माझी आई?


लेकी, सुनास पदराखाली,

खुप मायेने जपून असते

त्यांच्यासाठी माणुसकीचे,

दान मागते माझी आई


खंबीरपणे उभी राहते , 

आलेल्या त्या संकटकाळी

वाघासमान आजोबाची,

लेक लागते माझी आई


अच्छे दिनचे नारे देता, 

विकास अमुचा झोपी गेला 

वणवण फिरते पाण्यापाई,

फार त्रागते माझी आई


२.


अंदाज पावसाचा,आला अजून नाही

आरंभ पेरणीला, झाला अजून नाही


गोठ्यात बैल माझा ,बांधून वाट बघतो

झुडपास कोवळा का,पाला अजून नाही?


आले फिरून वारे, गावात मोसमी जर

शमल्या उरातल्या का,ज्वाला अजून नाही?


झाली तयार शेती, त्याचीच वाट बघतो

मातीस ओलवाया, आला अजून नाही


जर थांबला करोना, अद्याप कंपनीचा

अद्याप उघडला का,ताला अजून नाही?


आभाळ दाटले हे, त्या नाचती विजाही

रानात वाहला का, नाला अजून नाही?


३.


जीवनाचे सत्य उमजुन बुद्धमार्गी चालतो मी

सत्यमार्गी माणसांशी  प्रेमभावे वागतो मी


वासनेला शांत करतो,तोच त्याच्या अंतरीच्या

बुद्ध धम्माचा तयाला,मार्ग केवळ सांगतो मी


पाज पाणी ऐनवेळी, जन्मदात्यांना जराशे

अन् मनाने जप तयांना,लेकराला बोलतो मी


भावली ना लोकशाही,भोगवादी शासकाला

तर तयाला ऐनवेळी, आरसाही दावतो मी


जीवनी जर दु:ख येते,या मनाच्या मलिनतेने

घालवीण्या मळ मनाचा,अष्टगाथा वाचतो मी


या मनाच्या पाखराला, चेतनेने राखतो मी

कर्मभावे काळजावर,बुद्ध-लेणी कोरतो मी

...................................................