Showing posts with label ज्योत्स्ना राजपूत. Show all posts
Showing posts with label ज्योत्स्ना राजपूत. Show all posts

तीन गझला : ज्योत्स्ना राजपूत

 

 



१.


जसे स्वतःवर लिहितो आपण

तसे कुणावर  लिहितो आपण?


जमिनीवरती उभे राहुनी 

निळ्या नभावर लिहितो आपण


डोळ्यांमधले लपवत अश्रू 

कसे हशावर लिहितो आपण ?


कधी वाचले पुस्तक बिस्तक?

परीक्षणावर लिहितो आपण 


भोळे असतो ,फसतो तरिही

धूर्तपणावर लिहितो आपण


तुकडे करतो, वाटे घेतो

त्याच घरावर लिहितो आपण


वार्धक्याच्या काठावरही

बालपणावर लिहितो आपण


२.


लावले कित्येक त्यांनी चेहऱ्यावर चेहरे

ओळखाया येत नाही कोणते नक्की खरे


बोलणेही बंद केले मी जरी त्याच्यासवे 

काळजावर पाडतो तो रोज शब्दांनी चरे


आटल्या शेतातल्या साऱ्या  विहीरीही जरी

आटले का मायच्या डोळ्यांतले अजुनी झरे ?


एवढी तेव्हा कुठे सवलत असे भेटायची

फक्त फोटो पाहिला की लग्न दोघांचे ठरे


शौर्य पदकांनी तिच्या भिंती किती भरल्या म्हणे 

झुरळ नुसते पाहता भरते तिला का कापरे?


घालते चोचीत दाणे अन् उपाशी राहते 

पंख फुटल्यावर तिला विसरून जाती पाखरे


ह्या तुझ्या चाली खरेतर बघ मला कळतात पण

गप्प राहूनच तुला देईन आता उत्तरे 


३.


एकदाची भेट घ्यावी वाटते आहे जरा

एकदा समजून घेऊ मी खरी की तू खरा

 

बांधता येतो कुठे अंदाज कुठलाही अता?

तू खरोखर चांगला आहेस की आहे बरा?

 

फोनवर आता किती बोलायचे आपण असे

एकदा पाहून घेऊ ना खराही चेहरा


रेंज येते रेंज जाते ना अचानक सारखी

जीव हा होता किती मग कावरा अन् बावरा


हे असे बघ आपले मग होत असते नेहमी

काळजाच्या स्क्रीनवरती एक उठतो ना चरा


एवढे झाले तरी पण साथ नाही सोडली 

सोडला नाही कधीही या मनाचा उंबरा


 तू जरा पाऊस हो अन् भेट त्याच्यासारखा

भेटते मीही जशी व्याकूळलेली ती धरा


....................................................

ज्योत्स्ना राजपूत

पनवेल