Showing posts with label अर्चना मुरुगकर. Show all posts
Showing posts with label अर्चना मुरुगकर. Show all posts

तीन गझला : अर्चना मुरुगकर

 



१. 

राष्ट्र आज सांभाळू आपण
द्वेष, असूया जाळू आपण

कटू भाषणे नकोच आता
ऐक्याला कवटाळू आपण

ठिणगी पडते समाज जळतो
कळलाव्यांना गाळू आपण

भले वेचुया सुजाण बनुनी
सत्य जरा पडताळू आपण

नकोच खचणे उणेपणाचे
बलस्थानांना चाळू आपण

बंधुभाव हा असे दागिना
प्रगतीसाठी माळू  आपण

घेऊ वचने देशासाठी
कर्तव्याला पाळू आपण

२.

नाहीच जे येथे मुळी वेचायचे आहे मला
ते स्वप्न माझ्या आतले पेरायचे आहे मला

कोऱ्या पटावर रंग मी भरते हवे ते आजचे
चित्रास आयुष्या तुझ्या सजवायचे आहे मला

आले जरी काटेकुटे रस्त्यात केव्हा वाटले
सोसून कष्टांना पुढे चालायचे आहे मला

अंधारती जेव्हा दिशा नैराश्य जाळे टाकते
आशेतुनी नवचांदणे शोधायचे आहे
मला

मोहामुळे जी लालसा उत्पन्न होते सारखी
ध्येयास गाठाया तिला टाळायचे आहे मला

३.

माणूस एक हा जर वादात काय आहे?
विध्वंस सोडला तर युद्धात काय आहे?

साधाच मोगरा पण गंधात सत्व सारे
विश्वास संपला तर दोघात काय आहे?

ज्ञाना-तुक्यास पावत धावून येत गेला
पाषाण मानले तर देवात काय आहे?

सोबत असो नसो पण झुरते सख्याकरीता
त्यागास सोडले तर प्रेमात काय आहे?

गावी नसेल ती जर रमण्यात राम नाही
पाणी नसेल त्या पण गावात काय आहे?

.................................
अर्चना मुरुगकर
तळेगाव दाभाडे
9762863231