१.
ही मालमत्ता माझी स्थावर राहून जाते
चिंता उद्याची माझ्या घरभर राहून जाते
अभिषेक होतो अंगावर दगडाच्या दुधेरी
कोणास मिळणे कुटका-भाकर राहून जाते
मी खोल पुरल्या आशा माझ्या हृदयात आहे
पण एक इच्छा का वरच्या वर राहून जाते
ही सांज कलताना येते हळवी आठवण मज
अन कोवळेपण आभाळावर राहून जाते
माझ्या घराच्या तू नाही तर भिंती म्हणाल्या
का सांज ढळण्याआधी बेघर राहून जाते?
जाशील तर जा काहीबाही बोलून नुसते
दोघांत भलतेसलते अंतर राहून जाते
विसरून जातो आपण जाताना आपल्यांना
कविता दुराव्याची वळणावर राहून जाते
टाके दिले मी अन् रफु केले या जीवनाला
उसवून पांघरुणाचे अस्तर राहून जाते
वृद्धापकाळी कळते होते जीवन खरे जे
ते बालपण मागे झोक्यावर राहून जाते
आत्मा प्रवासी निघतो पैलतिरी अंत समयी
शव हे खुळी जोगण सरणावर राहून जाते.
२.
हा शेवट नाही माझा प्रारंभ असू शकतो
प्रवास आता हा थोडा पण लांब असू शकतो
अंदाज तुझे नकोस बांधू वरवरचे काही
तुला वाटतो त्यापेक्षाही खोल असू शकतो
गुलमोहर काया जणू तुझी वसंतात झाली
उधळला तुझ्यावरती माझा रंग असू शकतो
नकोस गुंतू माझ्यामध्ये हरवून स्वतःला
उपचार तुझा नाही तर मी रोग असू शकतो
परंपरा तू स्विकार अथवा नकोस माझ्या पण
मी विश्वाच्या पूर्व प्रथांचा स्तंभ असू शकतो
बिलगून कधी शब्दांचे ओघळ घे तू माझे
अश्रू कोणी अजूनही अस्वस्थ असू शकतो
येऊ दे आज विसाव्याला कविते जाताना
मी तुझाच वणवणणारा वैशाख असू शकतो
कुठे होतीस तू तेव्हाही मी गेल्यावरती?
चुकवून तुला गेलेला काळ असू शकतो
उधळून जन्म नकोस देऊ गझले माझ्यावर
उगाच चुकून आलेला मी ख्याल असू शकतो
संपलो जरी वाटत असेल तुला शेवटी पण
मी अस्तानंतरचे नवीन पर्व असू शकतो
निर्वंश मला करून जाऊ नकोस घनव्याकुळ
अंकुरणारा तुझा कुणी मी अंश असू शकतो
३.
मी भेटतो मज आपल्या दुराव्यासारखा
जग हे अनुत्तर मी असा सवालासारखा
डोळ्यातल्या प्रश्नासमान तू होतीस मज
मी राहिलो दोघांतल्या पुराव्यासारखा
तू थांब अथवा तू नकोस थांबू सोबती
कंठी रहा पण सूर हा निघाल्यासारखा
माझा कुठे आवाज आज नाही, की ठसे
उरलो जगी आहे असून नसल्यासारखा
का गंध हृदयी ठेवलास तू माझा पुन्हा?
तू कर खुलासा एकदा गुलाबासारखा
हिरवा इथे गेला ऋतू निघोनी कोवळा
मी वाळलेल्या आज काल गवतासारखा
चिमटीत धर मज एकदा तुला जमलेच तर
जाईन मी कोठे निघून भ्रमरासारखा
जाळा मला की संपवा, कुणी मिटवा खुणा
तुमच्या उरी राहीन मी निखाऱ्यासारखा
माझ्या गझल, कविता ,मला कुणी ना वाचले
मी एककल्ली एकटा किनाऱ्यासारखा
येणार नाही ती घरी परत सौदामिनी
बरसू नको मेघा असा उसवल्यासारखा
शोधू नका अन् उत्खनन नका माझे करू
मी राहतो माझ्या घरी हरवल्यासारखा
येईन मी दारी जसा निघाल्यासारखा
कप्पा उगी हळवा क्षणात झाल्यासारखा
रेंगाळलो मी शेवटी तुझ्यासाठी तरी
संदेशही नाही तुझा कळवल्यासारखा
....................................................

No comments:
Post a Comment