तीन गझला : अविनाश घोंगटे

 




१.


सोबती येते कशाला कोण सरते शेवटी

लागतो येथे गळाला कोण सरते शेवटी


पंख फुटल्यावर उडाली लाडकी सारी पिले

एकट्या उरल्या घराला कोण सरते शेवटी?


फार शोधाशोध होती चाललेली...संपली?

लागले सांगा तळाला कोण सरते शेवटी?


संपली समजून घेता जिंदगी सगळी तरी

सांगना कोणा कळाला कोण सरते शेवटी


ही निवडणुक संपली की संपली किंमत तुझी 

देतसे किंमत मताला कोण सरते शेवटी


श्वास का सुटता सुटेना काय समजेना मला?

त्रासते ह्या काळजाला कोण सरते शेवटी.


२.


चूल नाही पेटलेली लागली देवा झडी 

केवढी नाराज दिसते पावसावर झोपडी


चांगल्याही माणसांना चालणे जमते कुठे

वाट सत्याची जगा रे फार आहे वाकडी 


धावपळ माझीतुझी ही केवढी आयुष्यभर

पण बिछाना तोच नक्की शेवटाचा लाकडी


बाप पोत्यांनी जगाला दान देतो नेहमी

विठ्ठला त्याची रिकामी का दिसे मग पोतडी


हात मदतीचा जरासा एकमेका देत जा 

माणसा, माणूस म्हणुनी आखरी जोडू कडी.


३.


ती, तिची ती अदा जहर नुसती

जीवघेणी तिची नजर नुसती 


केवढा मोह हा किनाऱ्याचा

जन्मभर धावते लहर नुसती


आज शेयर तिचा असा पडला

'लग्न ठरले ' अशी खबर नुसती 


प्रेम हा डोह जीवघेणा बघ

फक्त तू एकदा घसर नुसती


फार सुंदर दरी इथे दिसते 

तू धुक्याचा हटव पदर नुसती


वाच पुस्तक जरा मनाचे तू 

फार पाहू नको कव्हर नुसती.

....................................................

No comments:

Post a Comment