१.
किती किती ही ठेवायाची घाई होती
सुरकुतलेल्या चेहऱ्यातली बाई होती
जीवनामधे होती नव्हती माहित नाही .
प्रत्येकाच्या स्टेटसवरती आई होती
तिथेच ठरली माय नेमकी अडगळ आहे
जिथे गायली तिने कधी अंगाई होती
सत्तापालट करता येते जागा हो तू
सांगुन सांगुन थकलेली ही शाई होती
काळजास या भेट दिल्यावर बदल्यामध्ये
उरल्यासुरल्या जखमांची भरपाई होती
नाही दिसल्या जगास माझ्या जखमा कारण
जखमांवरती सुंदरशी तुरपाई होती
२.
मनाच्या डायरीला मी सदा का पालटत जातो
नवी पाने, नवी घटना, तुला मी आठवत जातो
तुला विसरायचे म्हणतो तशी तू आठवत जाते
गुलाबी आठवांचा वड पुन्हा मग पालवत जातो
तुला भेटायचे असते,तुला बोलायचे असते
तुझी पण वाट बघताना दिवसही मावळत जातो
मनाला घालतो आवर मनाला सांगतो सावर
तरीही वेडसर भुंगा फुलावर बागडत जातो
कधी वाटे,कधी नाही तुझा मी हात पकडावा
उताविळ भावनांचा पुर धिराने ओसरत जातो
किती समजावतो आहे नको नाही बरोबर हे
तरीही खोलवर कोणी मनी का आवडत जातो ?
नभीच्या चातकावानी सरीचा थेंब घेतो मी
तुझ्या नाजूक ओठांवर हळू जो ओघळत जातो
किती वेडावली माझी नजर नजरेस भेटाया
कधी येथे, कधी तेथे, तुला मी सापडत जातो
....................................................
No comments:
Post a Comment